आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिभा कंपनीची दहा कोटीने माघार , १६ कोटींचा दावा आता सहा कोटींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील १६ रस्त्यांचे काम १६ कोटी रुपयात करणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रिज कंपनीने केवळ आठ रस्त्यांचे काम करून मनपावरच मूळ रक्कम आणि व्याज, असा ३५ कोटी रुपयांचा दावा २००६ मध्ये केला होता. मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, हा दावा मनपाचे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरणार होता. मात्र, एखाद्या प्रकरणात अधिकारी, अभियंते आणि विधिज्ञ यांनी इमानेइतबारे आणि जिद्द चिकाटीने काम केल्यास स्वराज्य संस्थेवर उलटणारे प्रकरण जिंकताही येते, ही बाब प्रतिभा कंपनीने दहा कोटींनी मागे घेतलेल्या दाव्यामुळे सिद्ध होते.

२००३ मध्ये मनपाने शहरातील १६ रस्त्यांच्या उच्च दर्जाच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रतिभा कंपनीला दिले होते. कंपनीने आठ रस्त्यांचे कामही केले. मात्र, त्यानंतर देयक तसेच करारनाम्याचा आधार घेत, कंपनीने विविध कारणे पुढे करून काम बंद केले. त्यानंतर २००६ ला कंपनीने मनपावर मूळ रक्कम १६ कोटी त्यावरील व्याज, असा एकूण ३५ कोटी रुपयांचा दावा केला होता. तसेच महापालिकेने दिलेली बँक गॅरंटी वटवून मनपा आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच विविध कारणे दर्शवून १६ दावे मनपावर केले होते. या दाव्यांची रक्कम १६ कोटी २००६ नंतर व्याज, असे एकूण ३५ कोटींचा दावा केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये हे प्रकरण बांधकाम विभागाचे माजी सचिव डी. जी. मराठे, सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता जनरल मॅनेजर एस. जी. पिंगळे, निवृत्त अधीक्षक अभियंता एस. के. विरमणी या तिघांच्या लवादासमोर मुंबई येथे तीन वर्षांपासून सुरू आहे. मनपाची बाजू शहर अभियंता अजय गुजर विधिज्ञ राजन देशपांडे मांडत आहेत.

३५ कोटींचा दावा मनपाची आर्थिक स्थिती पाहता अत्यंत महत्त्वाचा असल्याने या प्रकरणावर आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी विशेष लक्ष दिले. एरव्ही बहुतांश प्रकरणात हारणारी मनपा या प्रकरणात मात्र मजबूत स्थितीत आहे. सुनावणीदरम्यान मनपाने विरुद्ध पक्षाला कोंडीत पकडल्याने याचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच प्रतिभा इंडस्ट्रिजने दाखल केलेल्या दाव्यात सुधारणा करून मूळ १६ कोटींच्या दाव्यातून दहा कोटींचा दावा मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे केवळ सहा कोटी त्यावरील व्याज याच दाव्यावर सुनावणी सुरू असून, त्यातही मनपा भक्कम स्थितीत असल्याची माहिती मिळाली आहे.
मेहनतीचे फळ
आयुक्तडॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून केवळ महसूल वाढवण्याकडेच लक्ष केंद्रित केले नाही, तर दुसरीकडे काटकसरही केली. प्रतिभाचे हे प्रकरण काटकसरीचा भाग म्हणून आयुक्तांनी गांभीर्याने घेतले. सुनावणीच्या वेळी आयुक्त स्वत: उपस्थित राहिले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता अजय गुजर, शहरावर प्रेम करणारे अ‍ॅड. राजन देशपांडे यांनी या प्रकरणात महापालिकेची बाजू भक्कम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या मेहनतीला उपअभियंता अनिल गावंडे यांनीही मोठ्या प्रमाणात साहाय्य केले.