आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाय, गंगा आणि गौरी वाचवाल, तरच देश वाचेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - ‘सगळ्यांचे कल्याण ज्यातून साधता येते तो म्हणजे धर्म. हे विश्व त्या परमात्म्याची एक अलौकिक देणगी आहे. येथे सगळ्यांना जगण्याचा अधिकार त्याने दिला आहे. सुंदरतेची, अलौकिकतेची परिसीमा म्हणजे परमात्मा. आपण असत्याला सत्य मानून बसतो. सत्य तर परमात्मा आहे. म्हणून कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका. कोणाचीही हत्या करू नका. गाय, गंगा आणि गौरी वाचवाल, तरच देश वाचेल,’ असे प्रतिपादन तुलसी रामायणाच्या अभ्यासक श्रीरामकथाकार सुश्री आशाश्री दाणी यांनी येथे केले.
हनुमान मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने आयोजित श्रीराम कथा पर्वात शुक्रवारच्या प्रवचनात त्या बोलत होत्या. आशाश्री म्हणाल्या, गोमातेचे रक्षण, गंगेचे रक्षण, गौरीचे रक्षण झाले पाहिजे. गौरीला म्हणजे कन्येला गर्भातच मारले जात आहे. तिन्ही कुळांचा उद्धार करणारी मुलगी वाचली पाहिजे. मुलगी वाचली नाही, तर विवाह संस्कार ढासळतील. नारीशक्तीचे पूजन झाले पाहिजे. धर्म बिघडला, संस्कार बिघडला म्हणूनच अधोगती होत आहे, असे त्या म्हणाल्या. आज गाईच्या पोषणाऐवजी कुत्र्यांचे पोषण होत आहे. कुत्र्यांचे भरणपोषण करून काय साधणार आहात, असा सवालही त्यांनी केला. त्यापेक्षा गाईचे रक्षण करा. आज गंगेची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या गंगेला पुन्हा शुद्ध करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. कन्या हत्येऐवजी कन्यादान करा. ज्याने हा चैतन्यमय देह दिला त्याचे स्मरण करा तरच कल्याण होईल, असे आवाहन सुश्री आशाश्री दाणी यांनी केले.
व्यसनाधीन पालकांच्या मुलांनी कोणता आदर्श घ्यावा?
दारू, तंबाखूच्या व्यसनापायी अाज प्रत्येक शहरातील हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. मुलांच्या शाळेसाठी त्याच्या आईने मोठ्या कष्टाने जमवलेले पैसे व्यसनाधीन वडील दारू दुकानात उडवतो आणि रस्त्यातच पडून राहतो. अशा व्यसनाधीन पालकांकडून मुलांनी कोणता आदर्श घ्यावा, असा सवाल उपस्थित करून जुगार, दारू, मांस, परस्त्री आणि परधन ही पाच कलहाची आश्रयस्थाने असल्याचे आशाश्री दाणी यांनी या वेळी सांगितले.