आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधात्मक आदेशाची पायमल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (पूर्व) परीक्षा रविवारी 2 फेब्रुवारीला घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांची पायमल्ली झाल्याचे ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले. शहरातील 16 परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाले. याकडे प्रशासकीय व पोलिस अधिकार्‍यांनी कानाडोळा केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

नियम बसवले धाब्यावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा (पूर्व) परीक्षा शहरातील 16 केंद्रांवर सकाळी 11 ते 1 व दुपारी 3 ते 5 अशा दोन टप्प्यांत झाली. यावेळी केंद्रांवर गैरप्रकार व परिसरात कायदा, सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. रविवारी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनधिकृत व्यक्ती, वाहनांच्या परिसरातील प्रवेशास बंदी होती. जिल्हाधिकारी, अरुण शिंदे यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ही उपाययोजना केली होती. 16 परीक्षा केंद्रांवर सकाळी 5 ते परीक्षा प्रक्रिया संपेपर्यंत परीक्षा केंद्र व परिसरात 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू होत़े मात्र, या प्रतिबंधात्मक आदेशांना केंद्रांवर हरताळ फासल्याचे ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळले. या परिसरात अनधिकृत गाड्यांचा वावर होता. परीक्षार्थी, पोलिस व परीक्षा केंद्रांवर नियुक्त कर्मचारी मोबाइल वापरत असल्याचे आढळले. केंद्राच्या 100 मीटर परिसरात झेरॉक्स, फॅक्स, इंटरनेट कॅफे, टायपिंग सेंटर उघडे होते. प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळले.

एऩ एम़ चौधरी विद्यालय
या परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजतापूर्वीच परीक्षार्थींना परिसरात प्रवेश दिला होता. केंद्रात परीक्षार्थी मोबाइलवर बोलताना आढळले. सकाळी या केंद्रावर पोलिस नव्हते. परिसरात अनधिकृत व्यक्तींचा वावर होता.

जागृती विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय
या परीक्षा केंद्रावरही सकाळी 10 वाजता परीक्षार्थी व पालकांची गर्दी होती. परीक्षार्थी मोबाइल वापरताना आढळले. केंद्रापुढे अनधिकृत वाहनांची गर्दी होती. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकाचवेळी प्रवेश केला.

रालतो विज्ञान महाविद्यालय
रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वार सकाळी 10.30 वाजेपर्यंत बंद होते. महाविद्यालयात कर्मचार्‍यांव्यतिरिक्त कुणालाच प्रवेश दिला नव्हता. या परिसरात महिला पोलिस होती. विद्यार्थी 9.40 वाजेपासून रस्त्यावर उभे होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला. महाविद्यालयाजवळील झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे सकाळी 10 वाजता उघडले.

उस्मान आझाद उर्दू हायस्कूल
उस्मान आझाद उर्दू हायस्कूलमध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास परीक्षार्थी व त्यांच्या पालकांची गर्दी होती. परीक्षार्थी मोबाइल वापरत होते. या केंद्रावरील काही परीक्षार्थींनी केंद्रावरही मोबाइल नेल्याचे आढळले.

भिकमचंद खंडेलवाल विद्यालय
जुन्या शहरातील भिकमचंद खंडेलवाल केंद्र परिसरात सकाळी आठ ते पावणेनऊदरम्यान शांतता होती. या ठिकाणी पोलिस वा सुरक्षा रक्षक दिसला नाही. केंद्राजवळचे किराणा दुकान, लॉन्ड्री सुरू होती. 9 वाजून 54 मिनिटांनी येथे वाहनातून प्रश्नपत्रिकेसह अधिकारी पोहोचले.

मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय
या केंद्राजवळ दुकाने वा इंटरनेट कॅफे नाही. मात्र, केंद्र व परिसरात पोलिस बंदोबस्त नव्हता. केंद्राजवळील सरस्वती शिशू मंदिरात मुले हँडबॉलचा सराव करत होते. येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी मुलीही जमल्या होत्या.

सीताबाई कला महाविद्यालय
सकाळी 9.35 वाजता महाविद्यालयाचे प्रवेशद्वार उघडे होते. तेथे कुणीही नव्हते. विद्यार्थी परिसरात फिरत होते. येथे पोलिस नव्हते. विद्यार्थी,बाहेरच्या व्यक्ती महाविद्यालयात दिसून आले.

शिवाजी महाविद्यालय
सकाळी 8 ते 10.30 या वेळेत परीक्षा केंद्रावर गार्ड नव्हता. परीक्षार्थींनी महाविद्यालयाच्या परिसरात गाड्या ठेवल्यावर 9.45 च्या दरम्यान गेटजवळ पार्किंगची व्यवस्था केली. परिसरात मोबाइलचा वापर सुरू होता. 9.45 वाजता महिला कॉन्स्टेबल आल्या आणि प्रवेशद्वाराजवळ बेंचवर बसल्या. त्या मोबाइलवर बोलण्यात, मेसेज करण्यात व्यस्त होत्या. कॉलेज समोरच झेरॉक्स सेंटर आणि इंटरनेट कॅफे सुरू होते.

न्यू इंग्लिश हायस्कूल
परीक्षा केंद्राच्या पाहणीदरम्यान सुरक्षा रक्षक आढळला नाही. पार्किंगची व्यवस्था असली, तरी अनेक परीक्षार्थींनी वाहने शाळेच्या परिसरात ठेवली. 10.30 वाजेपर्यंत एकही पोलिस उपस्थित नव्हता. परीक्षार्थींसह त्यांच्या सोबत आलेले केंद्राजवळ फिरत होते. केंद्रावर शांतता होती.

प्राजक्ता विद्यालय केंद्र (कौलखेड चौक)
कौलखेड भागातील प्राजक्ता विद्यालय केंद्राचे प्रवेशद्वार सकाळी 8.30 वाजता बंद होते. काही मजूर मंदिराचे बांधकाम करत होते. पोलिस किंवा शासकीय अधिकारी येथे आढळले नाही. येथे चौकशी केली असता, एमपीएससीची परीक्षा असल्याने शांतता आहे, असे त्याने सांगितले.

मेहरबानू कॉलेज (गांधी रोड)
मेहरबानू कॉलेजमध्ये सकाळी 9 वाजता शांतता दिसली. 10 ते 12 परीक्षार्थी बाहेर चर्चा करताना आढळले. चिवचिव बाजारात काही मुले पुस्तके चाळताना आढळले. प्रवेशद्वारावर परीक्षार्थी खोली क्रमांकाचा बोर्ड लावण्याची वाट पाहत होते.