आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Principal Transfered In Case Of Navodaya Vidyalay Assault

विनयभंग प्रकरण: प्राचार्यही अडकले, दमणला केली बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: रामअवतार सिंह
अकोला - जवाहर नवोदय विद्यालयातील विनयभंग प्रकरणाची चर्चा देशपातळीवर होत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये प्राचार्यांची संशयास्पद भूमिका पहिल्यापासून "दिव्य मराठी'ने समोर आणली होती. वेगवेगळ्या समित्यांकडून चौकशी करण्यात येत असताना एका कार्यालयीन उच्चस्तरीय समितीच्या चौकशीमध्ये प्राचार्य हे प्राथमिक अहवालात काहीअंशी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांची आज बुधवारी दमण येथे बदली करण्यात आली आहे.

प्राचार्य रामअवतार सिंह गेल्या सहा वर्षांपासून जवाहर नवोदय विद्यालयात ठाण मांडून होते. त्यांच्या कार्यकाळात जवाहर नवोदय विद्यालय या ना त्या कारणाने वादग्रस्त राहिले आहे. त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत नसल्यामुळे विद्यालयामध्ये घाणेरडे राजकारणाने डोके वर काढले. त्याचाच परिणाम ४९ मुलींच्या विनयभंगाचे प्रकरण देशपातळीवर गाजल्याने नवोदय विद्यालयाची मान शरमेने खाली गेली. येथील तीन शिक्षकांवर मुलींच्या विनयभंगाचे गंभीर आरोप झाले आहेत. हे तीनही शिक्षक अटक असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाला विद्यालयातील अंतर्गत राजकारण आणि त्यातही प्राचार्य रामअवतार सिंह काहीअंशी दोषी असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची बाजू "दिव्य मराठी'ने पहिल्या दिवसापासून घेतली होती. जवाहर नवोदय विद्यालयाची राज्यस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. विद्यालयातील मुलींचे बयाण आणि तेथील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर त्यात प्राचार्य दोषी असल्याचा प्राथमिक अहवाल या चौकशी समितीने केंद्रीय समितीकडे मंगळवारी पाठवला होता. या समितीच्या शिफारशीवरून बुधवारी प्राचार्य रामअवतार सिंग यांची बदली दमण येथे केली आहे. त्यांच्या बदलीमुळे या प्रकरणात प्राचार्यांचाही समावेश असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या वर्षभरापासून प्राचार्याची प्रशासनावरील पकड ढिली झाली होती. केंद्रीय विद्यालयाच्या पुणे येथील आयुक्तांनी त्यास १० महिन्यांत नोटीस बजावल्या होत्या. तसेच अनेक संस्था संघटनांनी प्राचार्याची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली होती.

प्रभार शेगावच्या प्राचार्याकडे
प्राचार्य रामअवतार सिंग यांची बदली दमणला झाल्यामुळे प्राचार्यपदाचा प्रभार जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथील प्राचार्य एस. रामलिंगम यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यामुळे विनयभंग प्रकरणाची चौकशी होईस्तोवर एस. रामलिंगम प्राचार्यपदी राहणार आहेत.

विद्यालयातील कॅन्सर उखडून फेकणार
जवाहर नवोदय विद्यालयामधील प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीवर दबाव येऊ नये, म्हणून प्राचार्यांची बदली करणे क्रमप्राप्तच होते. प्राथमिक चौकशीमधून प्राचार्य दोषी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोषी आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होऊ शकते.
- आर. एन. राजू, सहायक आयुक्त

फिर्यादी असल्यामुळे नाही निलंबन
आरोपीशिक्षक राजन गजभिये शैलेश रामटेके यांच्याविरुद्ध प्राचार्यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून या दोघांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आताच जर प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई झाली, तर आरोपी गजभिये रामटेके यांच्या प्रकरणात फिर्यादीच दोषी ठरवल्यास त्यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, त्यामुळे प्राचार्यांवरील कारवाई तूर्तास लांबवली असल्याची चर्चा जाणकारांत होत आहे.

आरोपी लाडखेडकरचा जामीन फेटाळला
मुलींच्याविनयभंगप्रकरणी तिसरा आरोपी म्हणून अटक केलेल्या संदीप लाडखेडकर या तिसऱ्या शिक्षकाच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्यास बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने लाडखेडकर याचा जामीन अर्ज फेटाळला, तर सरकारी पक्षाच्या वतीने आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.