आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांसाठी आता कारागृहही झाले असुरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - येथील कारागृहात शिक्षा भोगणार्‍या एका कैद्याने दुसर्‍या कैद्याकडे 50 हजारांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर बरॅकमध्येच गळफास देऊन मारून टाकण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी कारागृह रक्षक सुरेश गवई यांच्यामार्फत मंगळवारी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी संतोष प्रभाकर वानखडे, उमेश आणि सतीश यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेवरून आता कारागृहही कैद्यांसाठी असुरक्षित झाल्याचे समोर आले आहे.


कारागृहच असुरक्षित झाले असून, येथे बंदीवानाच्या तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या जीवितालासुद्धा धोका निर्माण झाल्याची तक्रार एका बंदीवानाने केली आहे. एका गुन्हय़ामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला गोपाल किसन चव्हाण हा बरॅक क्रमांक-2 मध्ये आहे. त्याच्याच बरॅकमध्ये बंदी क्रमांक 874 संतोष प्रभाकर वानखडे हा शिक्षा भोगत आहे. संतोष वानखडे याने त्याचे सोबती उमेश आणि सतीश यांच्या मदतीने गोपाल चव्हाणला 50 हजार रुपयांची मागणी केली. गुपचूप पैसे दे, कुणाला सांगू नको, सांगितले तर तुला येथेच गळफास देऊन मारून टाकीन आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनाच मारून टाकणार आहे, असे म्हणून तो गोपाल चव्हाण याला 13 फेब्रुवारीपासून मारहाण करत आहे व धमकी देत आहे. सततच्या धमकीमुळे गोपाल चव्हाण याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्याने ही बाब कारागृह रक्षक सुरेश गवई यांना सांगितली. सुरेश गवई यांच्यामार्फत मंगळवारी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी संतोष प्रभाकर वानखडे, उमेश आणि सतीश यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे