आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये होते जास्त दराने दुधाची विक्री; ग्राहकांना फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरासह जिल्ह्यात खासगी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयाने दरवाढ झाली. त्यामुळे नव्या दराने दूध विक्री होत असली तरी, दुधाच्या पाकिटावर जुनीच किंमत छापलेली आहे. परिणामी, ग्राहक व दूध विक्रेत्यांमध्ये दुधाच्या किंमतीवरून दररोज शाब्दिक चकमक होत आहे. दूध दरवाढ होऊन नवीन दरानुसार दूध विक्री होत असताना दुधाच्या पाकिटावर जुना दर का, असा प्रश्‍न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ग्राहक पंचायतने पुढाकार घेऊन कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.


गत 25 जानेवारीपासून खासगी दुधाच्या दरात दोन रुपयाने दरवाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दूध दरवाढीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षातील खासगी दूध विक्रीची ही पहिली दरवाढ ठरली. राज्य शासनाने 25 नोव्हेंबरपासूनच दोन रुपयाने दुधाच्या किमतीत दरवाढ केली होती. राज्य शासनाच्या निर्णयाच्या पावलावर पाऊल ठेवत खासगी दूध कंपन्यांनी दुधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ जाहीर केली. 24 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून दुधाचे नवीन दर लागू झाले. त्यामुळे दुधाची वाढीव दराने विक्री करण्यात येत आहे.

म्हशीच्या व गायीच्या दुधामध्ये प्रतिलिटरमागे दोन रुपयाने दरवाढ केली आहे. या दरवाढीनंतर नव्या दराने दुधाची विक्री होत आहे. मात्र, दुधाच्या पाकिटांवर जुनाच छापील दर आहे. दुधाच्या काही खासगी कंपन्यांनी जुने पाकिटे संपेपर्यंत तेच वापरणार असल्याचे जाहीर केले. मात्र, दूध कंपन्यांच्या या भूमिकेमुळे दूध विक्रेते व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रसंग नेहमीच उद्भवत असल्याचे चित्र आहे.


अकोला शहरातील आठ लाख लोकसंख्येसाठी दररोज 25 हजार लिटर दुधाची विक्री होते. त्यामध्ये शासकीय दूध विक्रीचे प्रमाण अत्यंत अल्प असून, अकोल्यात दररोज सुमारे एक हजार लिटर शासकीय दुधाची विक्री होते. शहरात खासगी कंपन्यांच्या दुधाची सर्वाधिक विक्री होते.

जळगाव, अहमदनगर आदी जिल्ह्यातून ते दूध अकोल्यात येते. खासगी कंपन्यांनी दूध दरवाढ जाहीर केल्याने अकोलेकरांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र, दरवाढ केल्यावर दुधाच्या पाकिटांवर नवीन दर छापण्यात यावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.