बुलडाणा- खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास महाग झाला असून, प्रवाशांची लूट केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सोयी-सुविधेच्या नावाखाली सुरू असलेल्या या लुटीकडे सहा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दुर्लक्ष आहे.
सध्या बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील युवावर्ग मोठय़ा प्रमाणात पुणे येथे नोकरीकरिता जात आहे. तांत्रिक शिक्षणाला या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद व लागलीच मिळणारी नोकरी लक्षात घेऊन युवक वर्ग पुण्याकडे वळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पुणे बसेस मोठय़ा प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाकडून सोडल्या जात आहे. सकाळपासून ते रात्री 9.30 वाजेपर्यंत पुणे बस बुलडाणा, मलकापूर व जळगाव जामोद आगारातून सुरूच असतात. याबरोबरीत नागपूर येथे जाणार्यांची संख्याही अधिक आहेत. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळाच्याच नव्हे तर खासगी बसेसही सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाने निमआराम बसची सुविधा उपलब्ध केली आहे, तर ट्रॅव्हल्समध्ये स्लीपर कोच, एलसीडी आदी सोयी आहेत. तरीही सांगितल्या जाणारे व दिल्या जाणारे तिकिटात तफावत आहे.
सुविधांमुळे भाडेवाढ
ट्रॅव्हल्समध्ये असा त्रास होत नाही. आमच्याकडे 600 रुपये पुणे भाडे आहे. विविध सुविधा असल्यास त्यात वाढ होते. एलसीडी सुविधा असली, तर त्यात जादा भाडे लागते, असे एका ट्रव्हल्स व्यवस्थापकाने सांगितले.
तिकिटाचे दर वाढतेच
पुणे येथे जाण्याकरिता ट्रॅव्हल्सवाल्यांनी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या तिकिटाचे प्रवास दर 600 रुपये इतके होते. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या तिकिटाचे दर 700 रुपये होते, तर आज दिलेल्या तिकिटाचे दर 750 रुपये एवढे होते. राज्य परिवहन महामंडळाचे दर 524 रुपये एवढे आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आरक्षण मिळत नाही.