आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनवाणी भाविकांचे झाले हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नवरात्रोत्सवात नऊ दिवस अनवाणी व्रत करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. हे सर्व भाविक या दिवसांमध्ये दैनंदिन प्रवासात अनवाणी चालणेच पसंत करतात. त्याग करण्यासाठी नागरिक हे व्रत करतात. हा भाग भाविकांच्या श्रद्धेचा असला तरी, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे पायांना इजा होण्याची शक्यताही आहे. मात्र, याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

संपूर्ण शहरातील भाविक नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी पायी जातात. त्यांच्यासाठी प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. पण, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. शहरातील मुख्य मार्गावर तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांचे विद्रूपीकरण होत आहे.

तरुणांचे प्रमाण अधिक
तरुणवर्गात अनवाणी व्रत करण्याचे प्रमाण वाढत आहे. या नऊ दिवसांत सायन्स कॉलेजमध्ये शिकणारा एक अनवाणी मुलगा भेटला होता. त्याला विचारले, चप्पल हरवली काय? तर तो म्हणतो ‘नाही’. नवरात्र सुरू आहे नं ! त्याला म्हटलं नवरात्रात चप्पल घालत नसतात काय? आणि का घालत नसतात. तर तो म्हणाला, का घालायची नाही, हे माहीत नाही. पण सध्या हा ‘ट्रेंड’ सुरू आहे. म्हणून ठरवलं की, आपणही नवरात्रात चप्पल घालायची नाही. त्याच्या सोबतचा मित्र म्हणाला, काही नाही, हा सर्व मुलींना इम्प्रेस करण्याचा ‘फंडा’ आहे. चप्पल वगैरे पायात नसली की मुलींना वाटतं की, हा धार्मिक प्रवृत्तीचा आहे, पण असं काही नसतं. मुलीही आता हुशार झाल्या आहेत. तर त्यांच्या सोबतचा तिसरा मुलगा म्हणाला, की चप्पल न वापरणं म्हणजे एखाद्या गोष्टींचा ‘त्याग’ करू शकतो हे दर्शवणे होय.

या तिसर्‍या मुलाने सांगितलेलं कारण थोडंफार पटलं, पण मग त्याग करायचा तर तंबाखूचा विडी-सिगारेटचा, दारूचा, खोटं बोलण्याचा, बदमाशी करण्याचा, कुणाला त्रास देण्याचा, अप्रामाणिक राहण्याचा, कामचुकारपणाचाही करता येऊ शकतो. नुसतं नऊ दिवस चप्पल न घातल्याने त्याग होत असेल हे त्या देवीला कळत नसावे. बरं हल्ली हे चप्पल न घालण्याचं फॅडच आलं आहे. म्हणजे अगदी शाळकरी मुलांपासून तर पोलिसांपर्यंत लोक यात भक्तिभावाने सहभागी होतात. परवा तर एका शाळेचे चार-पाच मुलं मुली रस्त्याने अनवाणी दिसले. अगोदरच आपल्या अकोल्यातील रस्ते खराब, त्यात सगळीकडे घाण. किमान यासाठी तरी पायात चप्पल हवी. पण, या मुलांना कोण सांगणार ? घरात कुणीतरी मोठी व्यक्ती नवरात्रात बिनचपलेचे फिरत असणार. असं केल्याने पुण्य मिळते, असं कुठे ऐकलं असणार. आणि म्हणून ही मुलंसुद्धा अनवाणी नऊ दिवस चालत आहेत.

बर्‍याच सुशिक्षित लोकांसोबतच काही पोलिसही बूट न घालता आपली ड्युटी बजावत आहेत. खरं तर पोलिसांचा संपूर्ण युनिफॉर्म बुटाशिवाय पूर्णच होत नाही. पण तरीही ते नवरात्राच्या निमित्ताने अनवाणी फिरत आहेत. त्यांच्या वरिष्ठांनाही हे माहीत आहे. पण पुन्हा देवा-धर्माचं काम आहे. म्हणून अधिकारीसुद्धा काही म्हणत नाहीत. पण, पोलिसांना कुठंही फिरावं लागतं. कुणाच्याही मागे धावावं लागतं. निर्जनस्थळी जावं लागतं. म्हणून खरंतर त्यांच्या पायात बुटं दिलेली असतात. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न केला जातो.