तेल्हारा - विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पाच पक्ष समोरासमोर उभे आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाची किती कुवत आहे, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच. खिचडी सरकार येण्याची चिन्हे दिसत असून, खिचडी सरकार हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राचा विकास घडवू शकतो, म्हणून राज्याच्या विकासासाठी एकहाती सत्ता द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
तेल्हारा येथे ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे युवा उमेदवार महेश गणगणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल होते. चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने युती आघाड्या तुटल्या. ठोस निर्णय घेण्यासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे. जोपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील मागासलेल्या भागाचा विकास होणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नंबर वन होणार नाही.
विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस हा पक्षच महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकतो. म्हणून या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी मंचावर काँग्रेसचे पदधिकारी उपस्थित होते.
पोलिसांची दमछाक : तेल्हारातालुक्यातील बहुतांश गावांत आज, नवदुर्गा विसर्जन होते. ऐन नवदुर्गा विसर्जनाच्या दिवशी चव्हाण यांची सभा आल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.