आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Vegetable Market,Latest New In Divya Marathi

पहिल्याच पावसात झाले जनता भाजी बाजाराचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पहिल्याच पावसाने जनता भाजी बाजार समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. पावसामुळे जनता भाजी बाजारात जागोजागी चिखल झाला असून, दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याने विक्रेत्यांना येथे बसणे कठीण झाले आहे. परिणामी, भाजी विक्रेत्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जनता भाजी बाजारामध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने पहिल्याच पावसात भाजी विक्रेत्यांची दाणादाण उडाली आहे. बाजाराची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात सडक्या भाजीपाल्याचा ढीग जागोजागी पडलेला दिसतो, तर शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे परिसरात चिखल साचल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. अशा वातावरणात येथील अनेक भाजी विक्रेत्यांना चिखलात बसावे लागत आहे. या वातावरणाचा परिणाम भाजीपाल्यावरही पडत असून, तो दूषित होत आहे. या दूषित वातावरणामुळे भाजी विक्रेत्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, दूषित झालेला भाजीपाला खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर जनता भाजी बाजाराचे विदारक रूप समोर येण्याची शक्यता आहे. याकडे मनपाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, आगामी परिस्थिती लक्षात घेता भाजी बाजारात त्वरित स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे.
बाजारपेठेत परिसरात साफसफाई करावी
जनता भाजीबाजार शहरातील सर्वात मोठा भाजी बाजार आहे. परंतु, या ठिकाणी कोणत्याच प्रकारची साफसफाई होत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात भाजी बाजाराची विदारक स्थिती झाली आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजार परिसरातील साफसफाई त्वरित करण्यात यावी.’’ कपिल वाधवाणी, व्यापारी, भाजी बाजार
इतर भाजी बाजारांमध्येही घाणीचे साम्राज्य

जनता भाजी बाजाराव्यतिरिक्त शहरातील इतर प्रमुख भाजी बाजारांमध्येही साफसफाईअभावी पहिल्याच पावसात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील डाबकीरोडस्थित भाजी बाजार, किराणा बाजार परिसरातील भाजी बाजार, सिंधी कॅम्पस्थित भाजी बाजार तसेच इतर परिसरातील भाजी बाजारांची विदारक परिस्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वच भाजी विक्रेत्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.