आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Publication Function,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकाशन समारंभात आमदारांची अनुपस्थिती आली अंगलट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एकासाप्ताहिक पत्राच्या प्रकाशन समारंभाला अनुपस्थित राहणे तत्कालीन आमदाराच्या चांगलेच अंगलट आले. चक्क संपादक महोदयच निवडणुकीच्या रिंगणात उतरून आमदारांच्या विरोधात लढले. हा किस्सा आजही मतदारांना आठवण करून देतो.
संपादकाने एका विद्यमान आमदाराला प्रकाशनासाठी निमंत्रित केले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, संपादकांनी मात्र आमदार येणार म्हणून ढिंडोरा पिटला होता. त्यामुळे आमदारांच्या अनुपस्थितीमुळे संपादकांची अनेकांनी टर उडवली. यामुळे साप्ताहिकाचे संपादक चांगलेच खवळले. अपमानाचा बदला घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला आणि चक्क १९९५ च्या निवडणुकीत उभे राहून आमदाराला त्रस्त करून सोडले.
१९९० ते १९९५ कालावधीतील आमदारांचा बदला घेण्यासाठी संपादकांनी त्यांच्या पक्षांचा मित्रपक्ष असलेल्या पक्षात प्रवेश केला. काही दिवसातच जिल्हा प्रसिद्धिप्रमुख म्हणून पदही िमळवले. १९९५ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती. त्यामुळे मित्र पक्षाकडून निवडणुकीत उमेदवार देण्याचा प्रश्न नव्हता. परंतु, संपादकांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीत युती झालेली असताना पक्षाचा उमेदवार कसा, म्हणून विद्यमान आमदारांनी मित्रपक्षाच्या पक्षाध्यक्षांकडे तक्रार केली. तक्रारीवरून पक्षाध्यक्षांनी संबंधित उमेदवाराला मुंबईला बोलावून दहा हजार रुपये देऊन त्याची बोळवण केली. परंतु, जिल्हा प्रसिद्धिप्रमुखाने मात्र उमेदवारी मागे घेतली नाही, परंतु त्यांना एबी फॉर्मही मिळाला नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून ते मैदानात कायम राहिले. स्वत:चे साप्ताहिक असल्याने या साप्ताहिकातून स्वत:च्या उमेदवारीमुळे प्रचंड खळबळ, या आशयाचे वृत्तही प्रकाशित केले. साप्ताहिकांच्या कॉपीज विद्यमान आमदारांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात पोहोचवण्याचीही व्यवस्था केल्या गेली. या सर्व प्रकारामुळे विद्यमान आमदारांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

रिक्षा आणि लाऊडस्पीकर मिळाल्यानंतर प्रसिद्धिप्रमुख अपक्ष उमेदवाराने प्रचाराची रिक्षा केवळ आमदार महोदयांच्या निवासस्थान कार्यालय परिसरात फिरवण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा आमदाराच्या गोटात खळबळ उडाली. या वेळची निवडणूक भगव्या लाटेमुळे सोपी नसल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे, त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही बाब लक्षात घेऊन पुन्हा या प्रसिद्धिप्रमुख उमेदवाराला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेनुसार अपक्ष उमेदवाराला मुंबईची वारी करण्यासाठी तिकिटाची तसेच खर्चाची व्यवस्था करण्यात आली. त्यापूर्वी पाठिंबा देण्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. परंतु, एवढे करूनही या उमेदवाराची उमेदवारी कायम असल्याने या महाशयांनी दोनअंकी मतदान घेतलेच.