आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjabrao Deshmukh Agricultural University Helpline Not Working

कृषी विद्यापीठाची हेल्पलाइन शेतकर्‍यांसाठी ‘हेल्पलेस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दूरध्वनीद्वारे शेतकर्‍यांना तांत्रिक सल्ला देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हेल्पलाइन ‘हेल्पलेस’ ठरत असल्याचे चित्र आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागामार्फत कृषीविषयक मार्गदर्शनासाठी ही हेल्पलाइन काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. शेतकर्‍यांना कृषीविषयक तांत्रिक सल्ला मिळावा, असा हेतू यामागे होता. मात्र, अल्पावधीतच ही हेल्पलाइन नादुरुस्त स्थितीत आहे. 18002330724 या क्रमांकाला ‘कृषी माहिती वाहिनी’ म्हणून जाहीर करून कृषी विद्यापीठाने गाजावाजात उद्घाटनही केले. या यंत्रणेची जबाबदारी विस्तार शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. संचालक स्तरावरील महत्त्वाच्या अधिकार्‍याच्या नियंत्रणात ही हेल्पलाइन आहे. असे असतानाही काही दिवसांपासून ही हेल्पलाइन सतत नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण विदर्भ असताना महत्त्वपूर्ण असलेली ही हेल्पलाइन नादुरुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कृषी वाहिनीबाबत माहिती घेणार
कृषी विद्यापीठाची शेतकर्‍यांसाठी असलेली कृषी वाहिनी सुरू आहे की बंद याबाबत माहिती घेणार आहे. एकाच कनेक्शनवर दोन फोन असल्याने हा फोन कधी व्यस्त येतो. परंतु शेतकर्‍यांच्या तक्रारी पाहता लवकरच तो फोन कार्यान्वित करण्यात येईल. डॉ. व्ही. के. माहोरकर, संचालक, विस्तार शिक्षण, कृषी विद्यापीठ, अकोला

फोन उचलत नाही
रब्बी हंगामासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी मी वारंवार कृषी विद्यापीठाच्या माहिती वाहिनीला फोन केले. मात्र, फोन कुणी उचलत नाही. श्रीकृष्ण ठोंबरे, शेतकरी, कान्हेरी सरप

शासनाची कृषी हेल्पलाइन सुरू
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची हेल्पलाइन नियमित सुरू आहे. या माध्यमातून शेतकरी दररोज हेल्पलाइनद्वारे शेतीसंदर्भात आपल्या प्रश्नांचे निरसन करून घेत आहेत. कृषी विद्यापीठाच्या हेल्पलाइनबाबत मी काही बोलणे उचित वाटत नाही. प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

प्रशासनच अनभिज्ञ
कृषी माहिती वाहिनीबाबत अंमलबजावणी करणारी यंत्रणाच अनभिज्ञ आढळून आली. कृषी माहिती वाहिनीची जबाबदारी संचालक, विस्तार शिक्षण विभागाकडे आहे. कधी तांत्रिक अडचणींमुळे या वाहिनीमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले.

कुलगुरू ‘नो रिप्लाय’
या प्रकाराबाबत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल ‘नो रिप्लाय’ आला.

शेतकरी त्रस्त
काही शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाच्या कृषी माहिती वाहिनीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फोन तर लागतो. मात्र, कोणीही उचलत नाही. त्यामुळे माहिती घेण्यासाठी फोन करणारे शेतकरी या प्रकाराने त्रस्त झाले आहेत.