आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसार उघड्यावर: मदतीचा ‘ओलावा’ आटला; सरकारी यंत्रणेचा ‘असहकार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे उघड्यावर संसार पडलेल्या कुटुंबीयांना आता प्रशासकीय अनास्थेलाही सामोरे जावे लागत असून, अद्याप त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. एक-दोन नव्हे तर तब्बल 65 गावांतील नागरिकांचे जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले असून, त्यांचे डोळे प्रशासकीय मदतीकडे लागले आहेत.
जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा, उमा, निगरुणा, मन, मस, काटेपूर्णा या प्रमुख नद्या आहेत. या नदी काठावर वसलेली हजारो कुटुंब बेघर झाली आहेत. त्यांची कुठलीही पर्यायी व्यवस्था महसूल प्रशासनाकडून अद्याप करण्यात आली नसल्याचे दिसून येते. मिळेल तेथे शेतात किंवा रस्त्याच्या कडेला या नागरिकांनी आपले संसार थाटलेले आहेत. जीवनावश्यक वस्तू पुरवणे यामध्ये गहू, तांदूळ, केरोसीन पुरवणे, आवश्यकता भासल्यास फूड पॅकेटस पुरवण्याची जबाबदारी शासनाची असते. महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना मदत पुरवणे आवश्यक आहे. मात्र या मदतीचा विसर कर्मचार्‍यांना पडलेला दिसून येतो. नदीकाठी वीटभट्टय़ा, मासेमारी, मत्स्यपालन, रेतीचा उपसा करणार्‍या मजुरांची दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे. आडोसा मिळेल तेथे शोधत त्यांना आपला संसार थाटावा लागत आहे. या निमित्ताने प्रशासनाचा नागरिकांप्रति असहकार दिसून आला. प्रशासनाचे नियोजनच पावसाने कोलमडून टाकले. आता नागरिकांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत; बांबू लावून काढली पायवाट
पुरामुळे अनेक गावातील रस्ते बंद झाले आहेत. नदीच्या पाण्यासोबतच चिखल रस्त्यावर साचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मात्र हा चिखल काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा अजून पुढे आली नाही. जुने शहरांमधीलघरात प्रवेश करण्यासाठी दोन्ही बाजूने बांबू लावून पायवाट तयार करण्यात आली आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, मच्छरांच्या प्रमाणात वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी साचलेल्या पाण्यातून सर्पही येतात. त्यामुळे आरोग्यासोबतच नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.
यवस्था लवकरच करणार
नदीकाठी अनेक जणांचे लघू व्यवसाय सुरू आहेत. त्यांची संख्या दीड हजारांहून अधिक असल्याची नोंद शासनाकडे आहे. या व्यावसायिकांचा सध्या रोजगारीचा तर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय उपासमारीचीही समस्या भेडसावत आहे. खाणपाण्याची कुठलीही व्यवस्था शासनाकडून झालेली नसल्याची खंत नदीकाठच्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे.
जुने शहरातील काही भागांतील सिमेंट काँक्रीटचे रस्ते जुने झाल्याने खाली दबले आहेत. त्यामुळे साचलेले पाणी मुरत नसल्याने परिसरात पाणी साचले आहे. मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी परिसराची पाहणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता लवकरच पाणी काढण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे. योगेश गोतमारे, नगरसेवक
समस्यांच्या विळख्यात गावे
मूर्तिजापूर : हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी.
पातूर : पासटूल, भंडारज बु, आगीखेड, कोठारी बु, चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु, सस्ती, तुलंगा
बाळापूर : वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण
तेल्हारा : मन्नात्री बु, डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद
अकोट : केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, तिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी
बार्शिटाकळी : चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खुर्द, टाकळी
अकोला : म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु., कुरणखेड