आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभागाच्या ‘त्या’ आदेशाला केराची टोपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सिंधी कॅप भागातील शासकीय गोदामजवळील वाठुळकर ले-आउटमध्ये एका खासगी इमारतीमध्ये असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची जागा वापरण्याजोगी नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने चार महिन्यांपूर्वी केले असतानाही अद्यापही त्याच जागेत या कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.

अकोला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय खदान भागातील वाठुळकर ले-आउटमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. या ठिकाणी कृषी अधिकार्‍यांसह आत्मा योजनेचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा बसतात. ही जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. ही इमारत अत्यंत जुनी असून, अत्यंत अडगळीची आहे.

पाच ते सहा खोल्यांमध्ये जवळपास 30 अधिकारी, कर्मचारी आपले दैनंदिन कामकाज करतात. त्यात आपल्या विविध कामांसाठी शेतकर्‍यांना या कार्यालयात ये-जा करावी लागते. दररोज या कार्यालयात एवढी गर्दी असते की, त्या ठिकाणी जणू सभा भरली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुका कृषी अधिकारी काशीनाथ चौधरी यांना पत्राद्वारे सप्टेंबरमध्ये ही इमारत वापरण्याजोगी नसून, या ठिकाणी मोकळी हवासुद्धा येत नाही. मूलभूत सुविधांचा या कार्यालयात अभाव आहे. अशाप्रकारची लेखी सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही अद्यापही तालुका कृषी अधिकार्‍यांनी यावर केली नसल्याचे दिसून येते.

दूध डेअरी प्रशासनाचा खोळंबा
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची जागा बदलण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न झालेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी दूध डेअरीच्या वरचा हॉल उपलब्ध आहे.

ही जागा शासकीय असल्याने दूध डेअरी प्रशासनाने भाडे तत्त्वावर दिली तरी कुठलीही हरकत असणार नाही, असे कृषी विभागाने लेखी कळवले आहे.

मात्र, या जागेबाबत विभागीय दूध विकास अधिकारी अमरावती यांनी स्पष्ट कळवले की, तो हॉल बैठका आणि सभांकरिता उपयोगी असतो. त्यामुळे ती जागा मिळू शकत नाही. दरम्यान तालुक्यातील शेतकरी या कार्यालयात येतात, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय कर्मचार्‍यांना बसण्यासाठी तसेच रेकॉर्ड ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे या कार्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.

आत्मा योजनेच्या कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात आत्मा योजनेचे तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी बसतात. हे कार्यालय शेतकर्‍यांना दूर पडत असल्यामुळे आत्मा योजनेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकरिता इतरत्र बसण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहे.’’ हिंदुराव चव्हाण, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा अकोला.

दूध डेअरी प्रशासनाने दिला नकार
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या स्थानांतरणासंदर्भात गेल्या अनेक दिवसापासून शासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. शासकीय दूध डेअरीची जागा मागितली होती. मात्र, दूध डेअरी प्रशासनाने नकार दिला आहे.’’ प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. अकोला.