आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएमचे ग्राहक वार्‍यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-एटीएम सेंटरचा कोट्यवधींचा विमा उतरल्याने बहुतांश बँकांनी एटीएम सेंटरवरील सुरक्षा रक्षक हटवले आहेत. बँकांनी एटीएम सेंटरचा विमा उतरवला असला तरी एटीएम सेंटरचा वापर करणार्‍या ग्राहकाला मात्र वार्‍यावर सोडले आहे. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना ग्राहकांच्या सुरक्षेबाबत बँकांनी हात वर केल्याचेच चित्र आहे. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणार्‍यांवर हल्ले होत असल्याने ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. शहर आणि जिल्ह्यातील एटीएम सेंटरवरही अशीच स्थिती आहे. बहुतांशी सेंटरवर सुरक्षा रक्षकच नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
एटीएमशी संबंधित एखादी घटना घडली की सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले जातात आणि कालांतराने त्याचा विसरही पडतो. ग्रामीण भागातील ग्राहकांना चोवीस तास सेवा मिळावी म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही प्रत्येक शाखेत एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना अर्थमंत्री पी़ चिदंबरम यांनी केली होती. ग्रामीण बँकांनी शाखा सुरू कराव्यात आणि प्रामुख्याने त्या ग्रामीण भागात असाव्यात, अशी सूचनाही बँकांना केली होती. त्यानुसार गेल्या वर्षी बँकांच्या मोठय़ा प्रमाणात नव्या शाखा सुरू करण्यात आल्या. शिवाय सहकारी बँकाही एटीएमनी सुसज्ज झाल्या. असे असले तरी एटीएमच्या सुरक्षेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, असेच साधारण चित्र आहे.
सध्या अकोला शहरात 40 हून अधिक एटीएम सेंटर आहेत. जवळपास 70 टक्क्यांहून अधिक लोक एटीएमचा वापर करतात. विशेषत: युवा पिढी, नोकरदार, उद्योजक एटीएमचा वापर करतात. एटीएमच्या सुरक्षेसाठी प्रारंभी बँकांनी सिक्युरिटी गार्डची नियुक्ती केली. एटीएम कार्डचा गैरवापर होऊ नये, म्हणून सीसीटीव्हीचीही सोय केली. नंतर काही बँकांनी एटीएम सेंटरची उभारणी व सुरक्षा खासगी सिक्युरिटी कंपन्यांकडे सोपवली. या कंपन्यांनी एटीएम सेंटरचा विमा उतरवला असल्याने एटीएममध्ये चोरी झाली किंवा त्यात काही बिघाड झाला तरी त्यांचे काही बिघडत नाही. त्यामुळे अनेक बँकांनी एटीएम सेंटरवरील सुरक्षा रक्षक हटवले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॅश व्हॅन लुटण्याचेही प्रकार
एटीएमसोबतच कॅश व्हॅन लुटण्याचे प्रकारही घडतात. कॅशची असुरक्षित वाहतूक होत असल्याचे निदर्शनात आले आहे. कॅशची वाहतूक करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियम आखून दिले आहेत. मात्र, त्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.
सुरक्षा रक्षकांची कमतरता
बँकांना सेवा पुरवणार्‍या खासगी सुरक्षा एजन्सींनाही सशस्त्र सुरक्षा रक्षकांची वानवा आहे.त्यांची संख्या रोडावण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे, कायद्यात नमूद केलेल्या कारणांशिवाय खासगी शस्त्र बाळगण्याचा परवाना देऊ नये, असे म्हणत पोलिसांच्या आक्षेपामुळे सुरक्षा रक्षकांची वानवा आहे.