आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पोलिस आयुक्तालय प्राधान्यक्रमाने : गृहमंत्री पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - संवेदनशील शहरांमध्ये अकोल्याचा समावेश होतो. येथील पोलिस अधीक्षकालयाची श्रेणीवाढ करून त्याचे रूपांतर पोलिस आयुक्तालयात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्राधान्यक्रमाने हा मुद्दा मार्गी लावला जाईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. अमरावती येथील शासकीय विर्शामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुमारे वर्षभरापूर्वी पाटील यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यानच आपल्या कार्यकाळात अकोल्यात पोलिस आयुक्तालय आणि किनार्‍यावर सागरी पोलिस ठाणे सुरू करायचेच आहेत, अशी घोषणा केली होती. वर्षभरानंतर आबांना त्यांच्या या संकल्पाची आठवण ‘दिव्य मराठी’ने करून दिली. त्यावेळी त्यांनी अकोल्यात पोलिस आयुक्तालय होईलच, ही बाब पुन्हा अधोरेखित केली. राज्यभरात 11 सागरी पोलिस ठाणे सुरू झाले आहेत. सागरी किनार्‍यांच्या परिसरात हे पोलिस ठाणे कार्यरत आहेत. त्यांना आधुनिक सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे पाटील म्हणाले. अकोल्यातील पोलिस आयुक्तालयाच्या मुद्दय़ात काही तांत्रिक बाबी आहेत. शासनाचे या मुद्दय़ाकडे लक्ष आहे. पोलिस आयुक्तालय मंजूर करण्यासाठी शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीने अकोल्याच्या पोलिस विभागाची विभागणी करावी लागेल. शहराचा व्याप बघता हे पोलिस आयुक्तालय जरी छोटे राहणार असले तरी त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची गरज भासेल. तितकेच पोलिस बळ ग्रामीण भागासाठीही ठेवावे लागेल त्यामुळे एकाच वेळी इतक्या मोठय़ा मनुष्यबळाची उभारणी कशी करायची, हा प्रश्न शासनापुढे असल्याचे पाटील म्हणाले. धमक्यांना घाबरत नाही : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आले, की माओवादी नेते अनेकदा धमक्या देतात.

या धमक्यांना भीक घालत नाही, असे पाटील यांनी खमक्या आवाजात सांगितले. त्यांच्या हिंसक प्रवृत्तीला महाराष्ट्र पोलिस चोख प्रत्युत्तर देत आहेत, असे पाटील यांनी नमूद केले. पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत विचारले असता पाटील म्हणाले, दोन वेगवेगळ्या कायद्यांमुळे बदल्यांबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यायची, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. ट्रान्सफर अँक्टमधील तरतुदीनुसार कोणत्याही अधिकार्‍याचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईस्तोवर बदली करता येत नाही.

यंत्रणा अलर्ट
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी धमक्या दिल्या आहेत. अशा धमक्या या संघटना नेहमीच देतात. महाराष्ट्र पोलिस दल पूर्णपणे अलर्ट आहे. सिमी, माओवादी अशा प्रत्येक प्रतिबंधित संघटनेवर पोलिसांची करडी नजर आहे. आर. आर. पाटील, गृहमंत्री