आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरूच, अजून किती घेणार ‘चावे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मे महिन्याच्या सुरुवातीला अकोटमध्ये सुरू झालेला माकडाचा हैदोस जून उजाडला तरी संपलेला नाही. अद्यापही या पिसाळलेल्या माकडाचे चावे अकोटकरांना सहन करावे लागत असून, त्याला जेरबंद करण्यात वन विभाग पूर्णत: अपयशी ठरला आहे. माकड पकडण्यासाठी युद्धपातळीवर ठोस मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

अकोट शहर सातपुड्यानजीक असून, आसपास ब-यापैकी जंगल आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात येथील बाजारपेठ, बसस्थानक विविध भागांमध्ये होणारा माकडांचा हैदोस नागरिकांना नवीन नाही. मात्र, यंदा शहरात मेपासून आलेल्या माकडांच्या टोळीतील एक माकड पिसाळले असून, नागरिकांना चावा घेत शहरात हैदोस घालत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला या माकडाने चार ते पाच जणांना चावा घेतला, मात्र वन विभाग सुस्तच होता. त्यात १२ मे ला माकडाने न्यायाधीशांना चावा घेतल्याने वन विभागाने शोधमोहिमेस प्रारंभ केला. ही शोधमोहीम १६ जून उजाडला तरी सुरूच आहे. दरम्यानच्या काळात माकडाने अनेकांना चावा घेऊन जखमी केले. १४ जूनला माकडाने शहरात दोघांना चावा घेऊन जखमी केले. पिसाळलेल्या या माकडास पकडण्यासाठी वन कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, माकड पकडण्यात तरबेज असलेले नागरिक यांच्यासह ताफा दिवसभर शहरात फिरतो. मात्र, सायंकाळी रिकाम्या हाताने परततो. एकतर माकड त्यांना सापडत नाही, अन् सापडले तर त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील दहशत कायम आहे.

‘जागते रहो...’
अकोटच्याइंदिरानगर, राजदे प्लॉट, सिंधी कॅम्प बसस्थानक परिसरात या माकडाचा सर्वाधिक वावर आहे. बहुतांश हल्ले याच भागात झाले. त्यामुळे या भागातील रहिवासी भयग्रस्त असून, रात्री माकडापासून बचावासाठी घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून हातात काठ्या घेऊन जागरण करण्यात येत आहे.

शिका-यांचीही मदत
माकडालाजेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने आतापर्यंत तज्ज्ञ वन्यजीवप्रेमी, अधिकारी, लाठ्या, जाळे, पिंजरा अन् ट्रँक्युलाइजर गनचा वापर करून पाहण्यात आला. मात्र, अपयश आल्याने शुक्रवार, १२ जूनला व्यावसायिक शिका-यांचीही मदत घेतली. मात्र, यश हाती आले नाही.

शोध मोहीम नव्हे, केवळ ठरतोय फार्स
हेमाकड पकडणे वन विभागास शक्य नसल्यास त्यास ठार मारा, अशी मागणी अकोटमधील नागरिकांकडून होत आहे. अवघ्या काही तासांमध्ये फिरून माकड पकडणे शक्य नसल्याने वरिष्ठांनी यात लक्ष घालून विशेष मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

आमचे प्रयत्न सुरूच
प्रत्येक रेंजमधील दोन चौकीदार याप्रमाणे चार जण माकडाचा कायम दिवसभर शोध घेत आहेत. त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी मेडशीजवळील सावरगाव येथील माकड पकडणारे तज्ज्ञ आणले होते. मात्र, माकड आढळून आले नाही. माणसांचा ताफा घेऊन फिरले, तर ते दृष्टीस पडत नाही अन् ताफा नसलेल्या भागात अचानक हल्ला करत आहे. मात्र, त्याला जेरबंद करण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत.'' एस.डी. देशमुख, राउंड ऑफिसर

पिसाळलेले हे माकड हुशारीने पथकाला वारंवार चकमा देत आहे. पथक फिरत असलेला परिसर सोडून इतर भागांमध्ये तो हैदोस घालतो. तसेच त्याला गुंगी देण्यासाठी पथकाद्वारे टाकण्यात येणा-या खाद्यपदार्थांनाही तो हात लावत नाही. त्यामुळे त्याला पकडण्यात यश मिळत नाही.

आता नया प्रेस भागात धुमाकूळ
शहरालगतच्याभागांमध्ये धुमाकूळ घालणा-या पिसाळलेल्या माकडाने आता शहराकडे मोर्चा वळवला असून, नया प्रेस भागात धुमाकुळ घालणे सुरू केलेे. १७ जूनला या माकडाने १६ वर्षांचा तरुण कृष्णा वसू याच्या हाताला जोरदार चावा घेऊन जखमी केले. कमी-अधिक प्रमाणात माकडाच्या चाव्याने जखमी झालेल्यांची संख्या ५० वर पोहोचली, असली तरी अद्याप त्याला पकडण्यात यश आले नाही.