आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत चालणा-या परिचारिका महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची गुरुवारी रात्री काही मुलींनी रॅगिंग घेतली. यात विद्यार्थिनीचा हात मोडला. या घटनेचे पडसाद म्हणून शुक्रवारी दुपारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या दालनाची तोडफोड केली.
तिस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थिनीची अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी रॅगिंग घेतली. त्यानंतर सकाळी या विद्यार्थिनीने प्राचार्या एन. एम. देशमुख यांच्याकडे तक्रार केली. पुन्हा सकाळी साडेअकरा वाजता या विद्यार्थिनीला प्राचार्याच्या दालनासमोर काही मुलींनी मारहाण केली. यामध्ये या मुलीचा हात मोडला. या मुलीने चौथ्या वर्षातील 40 मुलींच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
या घटनेनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या दालनाची तोडफोड केली. प्राचार्य देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा त्यांनी या वेळी दिल्या. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी महाविद्यालयात धाव घेऊन बंदोबस्त वाढवला. त्यामुळे महाविद्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
विद्यार्थिनी म्हणते...
सर्व सीनियर मुली मला मानसिक आणि शारीरिक त्रास देतात. प्राचार्यांना सांगितले. मात्र, कारवाई केली नाही. गेल्या वर्षीसुद्धा या मुलींनी माझा छळ केला होता. आज मला प्राचार्यांच्या समोर मारले. त्यानंतर मी डीनकडे तक्रार करण्यासाठी चालले असता काही मुलींनी मला पाय-यांवरच खाली पाडून बेदम मारले.
दोष ‘त्या’ विद्यार्थिनीचाच
वसतिगृहात रॅगिंग झाली नाही. याअगोदर तिस-या वर्षातील मुलींनी तिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या मुलीने स्वत:च हात मोडून घेतला, ती कुणाचेही ऐकत नाही. याअगोदर तिनेच भांडणे केली आहेत. असे एक वेळा नाही, तर पाच वेळा झाले आहे. नंतर तिने माफीनामेसुद्धा दिले आहेत.
एन. एम. देशमुख, प्राचार्या
कॉलेजच्या बदनामीचा प्रयत्न
रॅगिंग ही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची होते. ही मुलगी तिस-या वर्षाला शिकते. त्यामुळे तिची रॅगिंग घेतली असे म्हणणे योग्य नाही. प्राचार्यांच्या दालनाची तोडफोड झाली त्याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. ही महाविद्यालयाची बदनामी करणारी घटना आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू.
राजेश कार्यकर्ते, वैद्यकीय अधिष्ठाता
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.