अकोला- अकोला रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या पार्किंग झोनमध्ये नेहमी अप-डाऊन करणारे शहरातील प्रवासी आपली वाहने ठेवतात. परंतु, या पार्किंग झोनचा मागील अनेक महिन्यांपासून लिलाव झाला नसल्याने प्रवाशांच्या वाहनांना कोणीच वाली नाही. परिणामी, प्रवाशांची वाहने बेवारस पडलेली असतात.
शहरातील अनेक नागरिक रेल्वेने नियमित अप-डाऊन करतात. त्या अनुषंगाने रेल्वे विभागामार्फत स्टेशन परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोनची निर्मिती करण्यात आली आहे. रोज ऑटोरिक्षा किंवा शहर वाहतूक बसने रेल्वेस्थानकावर ये-जा करणे प्रवाशांना परवडणारे नसल्याने ते आपली वाहने येथील पार्किंग झोनमध्ये ठेवतात. या वाहनांची निगराणी ठेवण्यासाठी या पार्किंग झोनचा तीन वर्षांसाठी लिलाव करण्यात येतो. या ठिकाणी अल्पदरातच प्रवाशांच्या वाहनांची देखरेख होत असल्याने प्रवासी आपली वाहने ठेवून निश्चिंत राहतात.
परंतु, लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर विशिष्ट कालावधीसाठी देण्यात आलेल्या या पार्किंग झोनचा कालावधी संपला आहे. या वाहनांची देखरेख करणारे कोणीच नसल्याने परिसरातील वाहन चोरीच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. या पार्किंग झोनचा लवकरात लवकर लिलाव करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केल्या जात आहे.