आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या नवा नियम प्रवाशांच्या मुळावर; आगामी अधिवेशनातही प्रश्न विचारू- खासदार धोत्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना आता आरक्षित रेल्वेच्या डब्यात पाय ठेवता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने आता वेटिंगसंदर्भातील नियम बदलले आहेत. त्यानुसार नेहमी आरक्षण निश्चित करून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. रेल्वेचा हा निर्णय अनेक प्रवाशांच्या मुळावर उठला असला तरी, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा आरक्षण निश्चित झाले नसले तरी वेटिंगवर उभे राहून जाऊ, असे म्हणून अनेक प्रवासी आरक्षणाच्या डब्यातून किंवा सामान्य डब्यातून आतापर्यंत प्रवास करत होते. मात्र, यामुळे रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दीची समस्या होती. रेल्वेच्या निर्णयामुळे अशा गर्दीवर आता नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

याआधी फक्त इंटरनेटवरून वेटिंग तिकीट मिळाले असल्यास प्रवाशास त्या गाडीतून प्रवास करता येत नव्हता. आता मात्र रेल्वेच्या आरक्षण खिडकीवरून वेटिंग तिकीट घेतले असले तरी तुम्हाला त्या गाडीतून प्रवास करता येणार नाही. असा प्रवास कुणी करत असल्यास गाडीतील टीसी त्या व्यक्तीस गाडीतून खाली उतरवू शकतात तसेच त्या व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो, असे नवीन नियम रेल्वे प्रशासनाचे आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सध्या महाराष्ट्रात सुरू करण्यात आली नाही. मात्र, त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याने त्याचा फटका असंख्य प्रवाशांना बसणार आहे.

टीसीला विचारून बसा !
ज्यांच्याकडे वेटिंग तिकीट असेल अशा प्रवाशांनी आधी टीसीकडे जागा आहे की नाही याची विचारणा करणे आवश्यक आहे. टीसीने जागा असल्याचे सांगितल्यासच त्या प्रवाशाला वेटिंग तिकिटावर प्रवास करणे शक्य आहे अन्यथा त्या व्यक्तीला रेल्वे प्रवास करता येणार नाही.

नियमात बदल करावा
नवीन नियमामुळे थेट प्रवाशांना व रेल्वेलाही फटका बसणार आहे. त्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्यात यावा व प्रवासी हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावा.
-रवी अलिमचंदानी, अध्यक्ष, विदर्भ यात्री संघ, अकोला.

अन्यायकारक निर्णय
रेल्वेचे नवीन नियम प्रवाशांवर अन्यायकारक आहेत. यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले आहे. हा प्रश्न आगामी अधिवेशनातही उपस्थित करून प्रवाशांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
-खासदार संजय धोत्रे, अकोला.