आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगचा तिढा; प्रवाशांना मनस्ताप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कंत्राटदाराने सप्टेंबर महिन्यात घेतलेले दुचाकी पार्किंगचे कंत्राट 9 डिसेंबरपासून सोडल्याने अकोला रेल्वेस्थानकावरील दुचाकी पार्किंग व्यवस्था पुन्हा एकदा वार्‍यावर आली आहे. गेल्या 17 दिवसांपासून पार्किंग व्यवस्थेला कुणी वाली राहिला नाही. पार्किंगच्या या तिढय़ामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेस्थानकावरील दुचाकी वाहने व त्याचे सुटे भाग कधी चोरीला जातील याचा नेम राहिला नाही.

अकोला रेल्वेस्थानकावरील दुचाकी पार्किंगचे कंत्राट 19 ऑगस्टपासून संपले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून पार्किंग व्यवस्थेचे कंत्राट मालेगाव येथील कंत्राटदाराला दिले. हे कंत्राट देण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. नव्या कंत्राटदाराने पैसे भरून सप्टेंबर महिन्यापासून अकोला रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा ताबा घेतला. कंत्राटाचे उर्वरित पैसे भरण्यासाठी कंत्राटदाराला रेल्वे प्रशासनाने सूचित केले होते. मात्र, कंत्राटदाराने पैसे भरण्यास नकार दिल्यामुळे रेल्वे प्रशासनाने कंत्राट सोडण्यास सांगितले. 9 डिसेंबरपासून कंत्राटदाराने दुचाकी पार्किंगचे कंत्राट सोडले आहे. या आशयाचा फलकही पार्किंग स्थळावर लावण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांसमोर वाहन कुठे उभे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकी पार्किंग व्यवस्था बेवारस झाल्याने वाहनांचे सुटे भाग व पेट्रोल चोरीचे प्रकार होत आहेत. अनेक प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर वाहने आणणे बंद केले. वाहने आणणार्‍या वाहनधारकांना स्वत:च्या जबाबदारीवर रेल्वेस्थानक परिसरात वाहने उभी करावी लागतात. वाहनधारकांना गेल्या 17 दिवसांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नव्याने निविदा : अकोला रेल्वेस्थानकावरील दुचाकी पार्किंगसंदर्भात गेल्या चार महिन्यांपासून विविध निविदा आल्या आहेत. निविदा प्रक्रिया करून नवीन कंत्राट दिल्यावरही पुन्हा पार्किंगचा तिढा निर्माण झाला आहे. आता पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच नव्याने निविदा प्रकाशित करण्यात येईल.

कंत्राटदारांची पाठ : दुचाकी पार्किंगच्या कंत्राट दरात यावर्षीपासून वाढ करण्यात आली. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराने कंत्राट घेतले नाही. मालेगावच्या नवीन कंत्राटदाराला दिलेले कंत्राट त्याने तीन महिन्यातच सोडले. आता कंत्राट दर 10 टक्क्याने घटवण्यात आल्याची माहिती आहे. तरीही कंत्राटदार नवे कंत्राट घेण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.

पार्किंगचा तिढा लवकरच सुटेल
दुचाकी पार्किंग कंत्राटाचा तिढा लवकरच सुटणार आहे. यासाठी विभाग स्तरावरून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्किंगचे कंत्राट देऊन प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. बी. पी. गुजर, स्टेशन मास्टर, अकोला.