आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला शहरात पावसाची संतत‘धार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात गुरुवारीही सलग तिसर्‍या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. रेल्वे-बससेवेवरही याचा परिणाम दिसून आला. रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याचे प्रवाशांचे टाइमटेबल कोलमडले तर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांचे कामकाजही प्रभावित झाले.

110 बस झाल्या रद्द
एसटी बसलाही पावसाचा तडाखा बसला. पावसामुळे गुरुवारी एसटीच्या 110 गाड्या रद्द करण्यात आल्या. गांधीग्रामजवळील पुलावर पाणी आल्याने अकोटकडे जाणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या. अकोट मार्ग बंद झाल्यामुळे अकोट, तेल्हारा, दर्यापूर, परतवाडा आदी गावांकडे जाणार्‍या रद्द करण्यात आल्या. दुपारनंतर म्हैसांगमार्गे मूर्तिजापूरकडे जाणार्‍या गाड्याही रद्द झाल्या. रिसोड, मंगरुळपीरकडे जाणाराही मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील बसही रद्द करण्यात आल्या होत्या.

रेल्वे धावल्या उशिराने
पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. मुंबईकडे जाणार्‍या गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. नागपूरकडे जाणार्‍या काही गाड्या वेळेवर, तर काही गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावल्या. दक्षिण मध्य रेल्वे मार्ग पावसामुळे प्रभावित झाला. या मार्गावरून जाणार्‍या गाड्या एक तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसावे लागले.

शाळांत 50 टक्के उपस्थिती
गुरुवारी सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण अत्यल्प होते. साने गुरुजी विद्यामंदिर मलकापूर येथील शाळेमध्ये सकाळच्या सत्रात 50 टक्के उपस्थिती होती, तर पावसाचा वेग कमी झाल्यामुळे दुपारच्या सत्रात 70 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी सांगितले. सुधीर कॉलनी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात सकाळी 50 टक्के, तर दुपारच्या सत्रामध्ये 70 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे मुख्याध्यापक कैलास सुरडकर यांनी सांगितले. उमरी येथील महात्मा फुले विद्यालयातील दुपारच्या सत्रात 70 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

सवरेपचारमध्ये शुकशुकाट
सवरेपचार रुग्णालयात रोज दिसत असलेली रुग्णांची गर्दी गुरुवारी दिसून आली नाही. बाहय़ रुग्ण विभागामध्ये शुकशुकाट होता. सवरेपचारमध्ये रोज 350 ते 400 रुग्ण ओपीडीमध्ये नोंदणी करतात. मात्र, गुरुवारी या संख्येत घट दिसून आली. सकाळपासून केवळ 125 रुग्णांची नोंदणी बाहय़ रुग्ण विभागामध्ये झालेली आढळून आली. रुग्णांची संख्या पावसामुळे रोडावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

भाजी बाजारावर परिणाम
भाजी बाजारावर पावसाचा परिणाम झाला असून, भाज्यांची आवक आणि ग्राहक कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. पालक, सांभारसारख्या पालेभाज्यांचे नुकसान झाले. ग्रामीण भागातून विक्रीस येणारा माल खराब झाला तसेच बाजारातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावली होती. गुरुवारीही बाजारात तुरळक ग्राहकी दिसून आली. किराणा बाजारावर पावसाचा फारसा झाला नाही. उत्सवांचा काळ असल्याने पाऊस सुरू राहिल्यास पुढील काळात इतर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

2250 पोत्यांची आवक घटली
कृषी उत्पन्न बाजारातील आवक पावसामुळे घटली आहे. रोज अडीच ते तीन हजार पोते माल शेतकर्‍यांकडून विक्रीस येतो. मात्र, पावसामुळे ही आवक अवघ्या 400 ते 450 पोत्यांवर येऊन ठेपली आहे. हंगामाच्या काळात तर ही आवक 20 हजार पोत्यांच्या घरात असते. कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 ऑगस्टला ज्वारीचे 53 पोते, गहू 69 पोते, मूग 41 पोते, तूर 25 पोते, हरभरा 344 पोते, भुईमूग 76 पोते तर सोयाबीन 439 पोते विक्री झाली. ही विक्री सर्वसाधारण दिवसांमध्ये चौपट असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शं. ना. बेंडे यांनी दिली.