आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची एन्ट्री लय भारी, उडवून टाकली दाणादाण सारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तेल्हारा तालुका 170 मि.मी., पातूर तालुका 123 मि.मी., अकोला तालुका 119 मि.मी., बार्शिटाकळी तालुका 115 मि.मी., तर बाळापूर तालुक्यात 102 मि. मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या एकूण टक्केवारीपेक्षा आतापर्यंत झालेला पाऊस खूप कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ 33.85 टक्के पाऊस झाला आहे.

न्यू भागवत प्लॉटमध्ये इंद्रप्रस्थ टॉवरच्या बाजूला कचरापेटी असून, केरकचरा नालीच्या बाजूला टाकला जातो. तापडियानगर चौकात रस्त्यावर, बिर्लारोडवर स्टेट बँकेच्या बाजूला, रामदासपेठेत खोडे यांच्या घराच्या बाजूला असलेली सर्व्हिसलाइन कचर्‍याने भरलेली आहे. नागफणी भागात, दामले मार्ग, गड्डम प्लॉट भागात, रेल्वे स्टेशन चौक, मालधक्क्यानजीक, अकोटफैलकडे जाताना महादेव मंदिराजवळ, तसेच या भागात नालीतील कचरा अन्यत्र हलवण्यात येत नसल्यामुळे नाल्या तुंबतात.

वाहनचालकांनो, जरा सांभाळून
रस्त्यांवरील खड्डय़ांची कामे पावसाळ्यापूर्वी झाली नाही. खड्डय़ांमध्ये पाणी शिरल्यामुळे शहरवासीयांची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांचा तोल जातोय. अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या अन्य भागातही स्थिती फार चांगली नाही. परंतु, ज्या भागात लोकांची ये-जा मोठय़ा प्रमाणात आहे, तेथील रस्ते चांगले असावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पावसाळ्यात रस्त्यांची कामे होणार नाहीत हे लोकांना माहीत आहे, परंतु काही मार्ग काढता येईल का, याचा जरूर विचार करावा. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकेल. या भागातून वाहने चालवताना खूप काळजी घेण्याची गरज आहे. रस्त्यातून वाहन काढाल तर पाठीचे दुखणे विकत घेण्याची वेळ येऊ शकते, तेव्हा सांभाळून.

येथे आहेत खड्डे
मनपा शाळा क्रमांक 2 पासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर, अशोक वाटिकेजवळ, गोरक्षण मार्गावर जनता बँकेनजीक, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनसमोर, रालतो विज्ञान महाविद्यालयासमोर, नेकलेस मार्गावर रघुवंशी मंगल कार्यालयासमोर, रतनलाल प्लॉट चौक ते टॉवर चौक, दुर्गा चौकात, ककून हॉस्पिटलसमोर, जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, रामदासपेठेत जलाराम कॉन्व्हेंट ते मराठानगरपर्यंत, गड्डम प्लॉट ते रेल्वे स्टेशन दरम्यान, गुरुद्वारासमोर, अकोट रोडवर हनुमान चौकात, संतोषी माता मंदिरासमोर, शिवाजी महाविद्यालयासमोर, जुन्या शहरात कस्तुरबा गांधी रुग्णालयासमोर.

वीजपुरवठा खंडित : अकोला टाउन फीडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महसूल कॉलनी, सिव्हिल लाइन, पत्रकार कॉलनी या भागात सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान वीज नव्हती. याशिवाय काही भागात विजेचा लपंडाव सुरू होता. विजेच्या तारा तुटण्याचे किंवा कोठे काही अपघात घडल्याची, वीज जास्त वेळ बंद असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात आलेली नाही. विजेसंबंधी असलेली कोणतीही तक्रार नागरिकांनी 18002333435 आणि 18002003435 या टोल फ्री नंबरवर करावी.

रोजच्या उलाढालीवर परिणाम
पावसामुळे भाज्या खराब होत आहेत. त्यामुळे त्याचे दर कमी केल्याने थोडे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच फारसे ग्राहक नसल्याने रोजच्या उलाढालीवर परिणाम झाला असून, आर्थिक नुकसान होत आहे.’’ गजानन धनबर, भाजी विक्रेता

भाजी बाजार थंड : पावसाचा ग्राहकांवर परिणाम झाला. ग्राहक बाजारात फिरकले नाही, त्यामुळे बाजार थंड होता. भाज्या मोठय़ा प्रमाणात खराब होत आहेत. त्याचा फटका भाजी विक्रेत्यांना बसत आहे. पालेभाज्यांचे दर कमी करण्यात आले. सध्या भाव स्थिर असले तरी पाऊस कमी झाल्यानंतर पालेभाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.