आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा थेंबथेंब साठवा; अन्यथा गंभीर परिणामांचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - यंदा पाऊस कमी झाला आणि यापुढे होणारा पाऊस क्षती भरून काढण्याची शक्यता नाही. त्यामुळे जलपुनर्भरणाशिवाय पर्याय नाही. यापुढे पडणारा थेंबन्थेंब साठवण्याकडे अकोलेकरांना लक्ष द्यावे लागेल. छतावरचे पाणी वाया जाऊ न देता ते आपल्या घराच्या परिसरात साठवल्याशिवाय भविष्यातील पाण्याची निकड दूर होणार नाही, याकडे जलतज्ज्ञ के. एम. मोहने यांनी लक्ष वेधले आहे.

छताचे पाणी शोषखड्ड्यात साठवण्यासाठी दोन बाय दोन बाय दोन आकाराचा (सहा-साडेसहा फुटांचा) खड्डा तयार करा. त्यावर सुरुवातीला रोळीचा थर, त्यानंतर विटांचा एक फुटाचा थर आणि शेवटी दगडांचा थर करावा. या पद्धतीने पाणी भूगर्भात साठेल. या प्रक्रियेवर सहा हजार रुपये खर्च येतो. बोअरवेल शोषखड्ड्यालगत असल्यास जून ते जून पाणी पुरण्यासाठी कोणतीही अडचण जात नाही. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव असल्याचे मोहने यांनी सांगितले.

छताचे पाणी पाइपद्वारे शोषखड्ड्यात जमा होईल, अशी रचना असावी. तसेच पाइप बोअरवेलमध्ये सोडताना मध्येच फिल्टर लावल्यास त्यासाठी तेराशे ते सोळाशे रुपये खर्च येतो. 2005-06 मध्ये जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या कार्यकाळात अकोल्यात जलपुनर्भरणाची खूप कामे झाली. अकोल्यातील शासकीय कार्यालये, औद्योगिक वसाहतीतील मोठी गोदामे, महाविद्यालये जलपुनर्भरण यंत्रणेद्वारे जोडण्यात आली. जुजबी दुरुस्ती केल्यास त्याचा लगेच फायदा होऊ शकतो. या वेळची स्थितीदेखील आणीबाणीचीच आहे. येत्या उन्हाळ्यात टंचाईशी दोन हात करण्याची तयारी ठेवून आतापासूनच तयारी केलेली बरी, असेही मोहने यांचे म्हणणे आहे.
मार्गदर्शनास सदैव तत्पर
जलपुनर्भरणासाठी शहरवासीयांना कोणतीही अडचण भासणार नाही. कोणालाही मदतीची गरज भासल्यास आम्ही नि:शुल्क मार्गदर्शनास सदैव तत्त्पर आहोत. लोकांनी जलपुनर्भरण करून घ्यावे. कोणतीही वास्तू त्यापासून वंचित राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे.’’
के. एम. मोहने, जल तज्ज्ञ, अकोला.