आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने केला मैदानांचा ‘खेळ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शालेय क्रीडा स्पर्धांचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी पावसाच्या व्यत्ययानंतर क्रीडांगणांची मात्र दुरवस्था झाली आहे. राज्यात दोन क्रीडा संकुले लाभलेला एकमेव अकोला जिल्हा यंदा 43 खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांसह पाच विभागीय व दोन राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी क्रीडांगणांची मलमपट्टी करणे आवश्यक असल्याचे मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे.

यंदा 1 ऑगस्टपासून सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धेने क्रीडा हंगामाची सुरुवात होणार होती. मात्र, सततचा पाऊस आणि मैदानाची खस्ता हालत यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेत अकोल्यासह अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्हय़ांचा सहभाग राहणार आहे.

त्यानंतर पुढील तीन महिने सातत्याने 43 विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. या स्पर्धा लालबहादूर शास्त्री क्रीडांगण, वसंत देसाई क्रीडांगणांसह अकोला क्रिकेट क्लब, जय बजरंग विद्यालय कुंभारी, न्यू इंग्लिश हायस्कूल, तालुका क्रीडा संकुल मूर्तिजापूर, प्रभात किड्स, गाडगेबाबा विद्यालय मूर्तिजापूर आदी मैदानांवर पार पडतील. मात्र, पावसाळ्याचा काळ असल्याने या मैदानांची हालत खस्ता आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत मैदानांवर चालणे कठीण असताना क्रीडा स्पर्धा एक आव्हानच आहे.

क्रीडाप्रेमींची नाराजी
शहराला या वर्षी विविध स्पर्धांच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. मात्र, पावसामुळे मैदाने सज्ज नसल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी आहे. क्रीडांगणाअभावी स्पर्धेत निभाव लागणार की नाही, अशी चिंता सहभागी खेळाडूंना सतावत आहे. खेळाडूंसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शहरात होणार्‍या स्पर्धांसाठी इतर जिल्ह्यांतील खेळाडू दाखल होणार आहे.

खेळाडूंचा अत्यल्प सहभाग
अकोला महानगर व जिल्हय़ात शाळा, विद्यालय, महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. मात्र, तरीही शालेय क्रीडा स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यल्प असतो. काही खेळांत एखादाच संघ किंवा खेळाडू असल्याने त्याला स्पर्धा न करताच विजेतेपद मिळते. रायफल शूटिंग, सायकल पोलो, वॉटरपोलो यांसारख्या खेळांबाबत अधिक जागृती करून खेळाडू तयार करण्याची गरज आहे. यासाठी केवळ क्रीडा विभागच नव्हे, तर क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालयांचाही पुढाकार आवश्यक आहे.

क्रीडांगणे स्पर्धेपूर्वी सज्ज होतील
दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम हा पावसाळ्यात असतो. त्यामुळेच त्याच्या तारखांमध्ये शिथिलता ठेवली जाते. त्यामुळे क्रीडा स्पर्धांच्या तारखेत बदल होतात. पावसाचे रंगरूप पाहून स्पर्धा कार्यक्रम बदलावा लागतो. तसेच स्पर्धेपूर्वी मैदाने सज्ज केली जातात. यंदा मात्र सातत्यपूर्ण पावसामुळे मैदानांच्या मलमपट्टीसाठी वेळच मिळाला नाही. पावसाने थोडीही उसंत देताच आम्ही मैदाने सज्ज करू. पावसाच्या व्यत्ययामुळेच आम्ही विभागीय फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली.