आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा कहर, भिजलं शहर! पुराचा धोका कायमच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकर्‍यांसह शहरातील नागरिक चिंतातुर झाले होते. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. परंतु, 22 जुलैला दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर रात्रभर जोरदार पाऊस झाला. रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक खोलगट वस्त्यांमध्ये, तर शहराच्या मध्य भागातील अनेक व्यापारी तसेच निवासी संकुलांच्या तळघरात पाणी शिरले. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला.

नाल्यांची समस्या कायम
प्रशासनाने नालासफाई झाल्याचा दावा केला होता, परंतु जोरदार पावसामुळे शहरातील लहान तसेच मोठे नाले दुथडी भरून वाहत होते. नाल्यांना क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाहून न्यावे लागल्याने नाल्यांमधील पाणी रस्त्यावर तसेच खोलगट भागात साचले. परिणामी, नागरिकांना रस्त्यावरील दोन-तीन फूट साचलेल्या घाण पाण्यातून घर गाठावे लागले. त्यामुळे नालासफाईची समस्या अद्यापही कायम असल्याची बाब पावसाने सिद्ध केली. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी दंडाच्या कारवाईचा निषेध केला, परंतु नालासफाई झाल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांच्या अति वापराचा फटका बसला. प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले चोकअप झाल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. न्यू भागवत प्लॉटमध्ये नाली चोकअप झाली की लोकांच्या घरात घाण पाणी शिरते. तसेच जठारपेठ मार्गावर साने गुरुजी वाचनालयासमोर नाली चोकअप झाल्याने रस्त्यावर घाण पाणी नेहमीच असते. बाजूला असलेल्या मंगल कार्यालयामुळे या ठिकाणी सतत घाण साचलेली असते. पॉलिथीन पिशव्या, नव्याने बाजारात आलेल्या पत्रावळी, द्रोण विविध भागात दिसून आल्या. शहरातील अस्वच्छता रोगराईला निमंत्रण देणारी आहे.उपनगरांना अधिक फटका

जुने शहरात मनपा क्षेत्रातील रेणुकानगर, चिंतामणीनगर, अयोध्यानगर, पार्वतीनगर, भगतवाडी तर महापालिका क्षेत्रालगत असलेल्या लक्ष्मीनगर, मेहरेनगर, आर्शयनगर, गुरुदेवनगर, कोर्ट कॉलनी, शांतीनगर, अंबिकानगर भाग जलमय झाला होता.
शाळांच्या छतांना गळती
हरिहरपेठ, रामदासपेठ भागातील मनपा शाळांचे छत गळाल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसता आले नाही. सतत पाऊस झाल्यास आणि छत गळत राहिल्यास इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हरिहरपेठ भागातील महापालिकेच्या आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक झाली आहे.