आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajarajeshvara Temple,Latest News In Divya Marathi

बम बम भोलेचा गजर; सकाळी साडेचारला महादेवाला अभिषेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महानगराचे आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिरात 28 जुलैला पहिल्याच श्रावण सोमवारी शिवभक्तांनी दर्शन अन् जलाभिषेकासाठी गर्दी केली. चौथ्या श्रावण सोमवारी अकोल्यात होणारा अद्वितीय कावड, पालखी उत्सवाची झलक यंदा पहिल्याच श्रावण सोमवारी अकोलेकरांनी अनुभवली. शहरातील अनेक शिवभक्त मंडळांनी पालखी सजवून कावडीने पूर्णा नदीचे जल आणून राजराजेश्वराला जलाभिषेक केला, तर इतरही शिव मंदिरांमध्ये महादेवाची पूजा, दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

मासोत्तम र्शावणात शिव, विष्णू व सूर्य पूजनाला विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवार तर शिवभक्तांच्या जल्लोषाचा, भक्तीचा दिवस. शहरातील प्रमुख शिव मंदिर राजराजेश्वरात श्रावण सोमवारनिमित्त सकाळी साडेचारला महादेवाला विधीवत अभिषेक झाला. त्यानंतर साडेपाचला आरती करण्यात आली. मंदिराचे प्रमुख पुजारी हरिभाऊ कापडी यांच्या हस्ते पूजाअर्चा व आरती झाली. त्यानंतर सकाळी साडेसहाला पुन्हा आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महिला-पुरुषांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यासोबतच विविध भागांतील शिवभक्त मंडळ पूर्णा नदीचे जल कावडी घेऊन बम बम भोलेचा गजर करीत मंदिरात दाखल होत होते.

शहर कोतवाली ते राजेश्वर मंदिरदरम्यान मार्गावर शिवभक्तांचा जल्लोष पाहण्यासाठी नागरिक जमले होते. डीजेच्या तालावर नाचत शिवभक्त खांद्यावर भरण्यांमध्ये जल घेऊन झपाझप पावले टाकीत राजेश्वराकडे निघाले. जयहिंद चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. मंदिरात दाखल झाल्यानंतर शिवभक्तांनी खांद्यावरील कावडी, पालखीसह महादेवाला पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर पूजन करून जलाभिषेक करीत हर हर महादेवचा गजर केला. दरवर्षी चौथ्या श्रावण सोमवारी मोठय़ा प्रमाणावर कावडी व पालखी निघतात. मात्र, यंदा पहिल्याच श्रावण सोमवारपासून मोठय़ा पालखी व कावडींची गर्दी दिसून आली. यामध्ये मुख्यत्वे वीर लहूजी वस्तादनगर, खोलेश्वर, देशमुखपेठ, शिवभक्त मंडळ, शिवचरणपेठ शिवभक्त मंडळ, जुने शहर शिवभक्त मंडळ आदींच्या मोठय़ा पालखी व कावडी होत्या.