आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Bhogale News In Marathi, Nirlep Industry Group, Divya Marathi, Buldana

चाकोरीच्या बाहेरचा विचार करणारेच ‘जिनिअस’ ठरतात,उद्योजक राम भोगले यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - वर्षानुवर्षांपासून समाज एका विशिष्ट चाकोरीतच जगत आलेला आहे. इतकेच नव्हे, तर समाजाने कुणालाही चाकोरीबाहेर जगण्याची परवानगी दिली नाही. किंबहुना चाकोरीबाहेर जगणार्‍यांना त्रासच झाला आहे व त्याला वेड्यातदेखील काढल्या गेले आहे. परंतु, ज्यांनी या चाकोरी बाहेरचा विचार करून अमलातदेखील आणले तेच खरे जिनिअस ठरले. एखादी नावीण्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या कल्पनेचे वेड असावे लागते. परंतु, त्या वेडेपणासोबतच वास्तवाचे भान असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. ध्येय वेडेपणासोबतच वास्तवाचे भान असल्यास ते संशोधन समाजोपयोगी ठरते. आइनस्टाइनचे बहुतांश शोध त्याला वास्तवाचे भान असल्यामुळे समाजोपयोगी सिद्ध झाल्यामुळे जिनिअस म्हणून आइनस्टाइनचेच नाव घेतले जाते, असे विचार निर्लेप ग्रुप औरंगाबादचे चेअरमन राम भोगले यांनी व्यक्त केले.
स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखली येथे 14 मार्च रोजी आयोजित जिनिअस 2014 - उद्याचे आइनस्टाइन या राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ यादव, विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य व्हि. एल. भांबेरे, शरद भाला, प्राचार्य इंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, जी गोष्ट सर्वसामान्यांना सुचत नाही. परंतु, एखाद्याला ती सुचते व तो त्याची सहज अंमलबजावणी करतो त्याला आपण जिनिअस म्हणतो. परंतु, जिनिअस हे तांत्रिक क्षेत्रातच असतात असे नाही, तर साहित्य, कला, क्रीडा, लेखन अशा अनेक क्षेत्रांतदेखील जिनिअस व्यक्ती असतात. जिनिअस असण्याचा व परीक्षेतील गुणांचा काहीच संबंध नाही हे त्यांनी अनेक उदाहरणे देत पटवून सांगितले.
अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी या प्रसंगी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ वर्गामध्ये माहिती देणे हा आमचा उद्देश नसून, त्यांना ज्ञान प्रदान करणे व त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच जिनिअस तांत्रिक महोत्सवाचा उद्देश आहे. आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना डॉ. यादव यांनी सांगीतले की, अश्या तांत्रिक महोत्सवाचा प्रत्येक विद्यार्थ्यानी लाभ घेतला पाहिजे व प्रत्येकाने आपल्या आयुष्यात योग्य वेळी जिनिअस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 13 व 14 मार्च रोजी आयोजित या दोन दिवसीय तांत्रिक महोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 124 निवडक स्पर्धकांनी भाग घेतला. सदर तांत्रिक महोत्सवाचे मुख्य आकर्षण टेक्स्टाइल पाक ठरले. यामध्ये विद्यार्थ्यांनी कापसापासून तयार कपड्यापर्यंतचा प्रवास विविध प्रात्यक्षिकांद्वारे सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे करून दाखवला.
त्याचप्रमाणे आजच्या काळातील परवलीची प्रदर्शनी रोबो रेस, रोबो वारचा थरार प्रदर्शनीस भेट देणार्‍यांनी अनुभवला. खेळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान समजण्याकरिता निर्मित टेक्निकल गेमिंग झोनचा शालेय विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. त्याचप्रमाणे विमानाचे प्रत्येकाला असलेले आकर्षण जिज्ञासा थोड्या फार प्रमाणात पूर्ण व्हावे याकरिता ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वर्तमानामध्ये विद्यार्थ्यांनी वेध घ्यावा याकरिता ‘व्हिजन 2020’ स्पध्रेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या पर्शिमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. संचालन प्रा. रवि राजभुरे, तर तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. आर. पी. चोपडे यांनी मानले.
या सर्व कार्यक्रमाला अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.