आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनसंपदेपेक्षा अधिक ग्रंथसंपदाच महत्त्वाची- रंगकर्मी राम जाधव यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- धनसंपदा व ग्रंथसंपदा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडतात. मात्र, अलीकडे ग्रंथसंपदेपेक्षा धनसंपदेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रंथामुळे मनुष्य सुसंस्कृत होत असल्याने ग्रंथसंपदाच महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून हा संदेश युवकांमध्ये रुजण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी तथा मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी व शिवाजी महाविद्यालयातर्फे आयोजित तीनदिवसीय ग्रंथोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. याप्रसंगी राम जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते. ग्रंथोत्सव संयोजन समितीचे डॉ. गजानन नारे, डॉ. किरण वाघमारे, भूषण बापट, प. रा. कारंजकर, डॉ. आशीष राऊत, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

राम जाधव पुढे म्हणाले की, ग्रंथ वाचनाने आत्मानंद मिळतो, व्यक्तिमत्त्व फुलून समाजात प्रतिष्ठा मिळते तसेच माणूस सुसंस्कृत होत असल्याने ग्रंथांची जोपासना अत्यंत गरजेची आहे. नाट्यक्षेत्रालाही ग्रंथोत्सवात कुठेतरी स्थान मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अलीकडे वाचनाच्या पद्धतीत बदल झाला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांनी या वेळी सोशल नेटवर्कमुळे युवापिढी इंटरनेटवरून वाचन तसेच विचारांच्या आदान-प्रदानाचे कार्य साधते, असे मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या विश्वात नेऊन वाचनाची गोडी निर्माण करण्याचे कार्य या ग्रंथोत्सवाने साधले. तीन दिवसांपासून युवावर्गाच्या पुस्तक खरेदीवरून ते दिसून आले, असे मत डॉ. सुभाष भडांगे यांनी व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी ग्रंथोत्सवाला सहकार्य करणार्‍यांचे आभार मानले. हा ग्रंथोत्सव म्हणजे छोटेखानी साहित्य संमेलनच आहे, असे मत डॉ. गजानन नारे, किरण वाघमारे व अन्य मान्यवरांनी व्यक्त केले. या वेळी अजिंक्य साहसी संघाचे धनंजय भगत, शिल्पकर्मी सतीश पिंपळे, शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. एम. आर. इंगळे, आशीष राऊत, जिल्हा माहिती कार्यालयाचे नितीन डोंगरे, चंद्रकांत पाटील, गुलाबराव बंड, विश्वनाथ धुमाळ, हर्षदा गडकरी, हबीब शेख, गजानन इंगोले, किसन कडू, सुनील टोमे, सुभाष मरसकोल्हे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. रामेश्वर भिसे यांनी केले. ग्रंथपाल डॉ. आशीष राऊत यांनी आभार मानले.

पावणेचार लाखांची पुस्तक विक्री
23 ते 25 जानेवारीदरम्यान च्या तीन दिवसांत ग्रंथोत्सवातील एकूण 35 स्टॉल्सवरून सुमारे पावणेचार लाखांच्या पुस्तकांची विक्री झाली. यामध्ये स्पर्धा परीक्षा, पर्यटन, ऐतिहासिक पुस्तकांसह अभ्यासक्रमांना पूरक अशा पुस्तकांची संख्या अधिक होती.