आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमाई योजनेमध्ये 150 जणांचे घर होणार पक्के, निधीमुळे उघडली घरकुल याेजनेची दारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्य शासनाच्या रमाई घरकुल योजनेंतर्गत १५० लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता झोपडी अथवा कच्च्या निवासातून मुक्तता मिळणार आहे, तर याच योजनेतील १३३ घरकुलांचे काम प्रगतिपथावर असून, ३९० घरकुलांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवले आहेत. त्यामुळे या वर्षभरात हजारापेक्षा अधिक नागरिकांना हक्काची घरे मिळतील.
रमाई योजनेंतर्गत २०१३-२०१४ या वर्षात १६६ घरकुलांच्या कामाला मंजुरी मिळाली होती. परंतु, शासनाने योजना जाहीर केल्यानंतर निधी मात्र अपुरा दिला. त्यामुळे १६६ पैकी ३३ घरकुलेच पूर्ण होऊ शकली, तर १३३ घरकुलांचे बांधकाम रखडले होते. घरकुलाच्या बांधकामासाठी कच्ची घरे पाडल्याने, तर दुसरीकडे बांधकाम थांबल्याने अनेकांना रस्त्याचा निवारा घ्यावा लागला. राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन आघाडी शासनाने निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ३४ कोटी रुपयांचा निधी रमाई घरकुल योजनेसाठी महापालिकेकडे वळता केला. त्यामुळे रखडलेल्या १३३ घरकुलांचे काम पुन्हा सुरू झाले, तर मंजूर प्रस्तावांचा मार्गही मोकळा झाला होता.
निधी प्राप्त झाल्यानंतर रखडलेल्या घरकुलांचा मार्ग मोकळा झाला. परंतु, प्राप्त २६६ प्रस्तावांची स्क्रुटीनी करण्याचे काम मानसेवींना कामाचे आदेश दिल्याने रखडले होते. मानसेवी अभियंत्यांना कामाचे आदेश दिल्यानंतर घरकुलांच्या प्रस्तावाच्या स्क्रुटीनीचे काम सुरू करण्यात आले. स्क्रुटीनीचे काम पूर्ण झाल्यानंतर समाजकल्याण विभागाने मंजुरी दिली. परंतु, प्रभारी आयुक्तांनी अनेक दिवस फाइल पेंडिंग ठेवली. परंतु, प्रभारी पद सोडण्याच्या आधी प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांनी मंजूर १४७ घरकुलांच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला.

१००० घरकुले होण्याची शक्यता
यापूर्वी३३ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर १३३ घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. आता १४७ घरकुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, तर ३९० घरकुलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे मंजुरीचे काम वेगाने झाल्यास येत्या आर्थिक वर्षात किमान १००० घरकुलांचे काम पूर्ण होईल.
अशी आहे रमाई घरकुल योजना
नवबौद्धसमाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बांधवांना हक्काचे घर मिळावे, या हेतूने राज्य शासनाने रमाई घरकुल योजना जाहीर केली. यामध्ये लाभार्थ्याला १०० टक्के दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. या अनुदानातून २७० चौरस फूट बांधकाम करावे लागते. यासाठी स्वत:ची अथवा लीजवरील पट्ट्याची जागा अावश्यक.

३७० प्रस्ताव तयार
यापूर्वी२६६ प्रस्ताव मंजुरीसाठी समाजकल्याणकडे पाठवले होते. पैकी १४७ घरकुलांना मंजुरी मिळाली, तर आता ३९० चे प्रस्ताव पाठवण्यात आले. समाजकल्याण विभागाच्या मंजुरीनंतर या घरकुलांच्या कामाचा मार्गही मोकळा होणार आहे.