आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पृथ्वीराजां’ना ‘अशोक ’व्हायचे नाही : आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘राज्यातील सत्ताधार्‍यांचे कामकाज ढेपाळले आहे. जनतेची कामे होत नाही. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आपली परिस्थिती अशोक चव्हाणांसारखी व्हायला नको, म्हणूनच ते फायलींवर सह्या करताना दक्षता घेत आहेत,’ अशी उपरोधात्मक टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धावर रामदास आठवलेंनी ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावरून टोला लगावला.

रामदास आठवले यांनी आपल्या अकोला दौर्‍यादरम्यान ‘दैनिक दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी रामदास आठवलेंनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर चौफेर टीका करून विविध विषयांवर आपले मत मांडले. देशात दलितांवर होणारा अन्याय आजही कमी झालेला नाही. शहरात जातीयवाद कमी होत असला तरी, ग्रामीण क्षेत्रामध्ये कायम आहे.याला कॉंग्रेसचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप आठवलेंनी करून आंतरजातीय विवाहाचे सर्मथन केले. सर्वात जास्त आंतरजातीय विवाह होणार्‍या जिल्ह्याला प्रोत्साहन देऊन पुरस्कार स्वरूपात पाच कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव सरकारपुढे मी मांडला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नसल्याची त्यांनी सांगितले. पक्ष विस्तारासंदर्भात विचारलेल्या प्रo्नावर त्यांनी आगामी काळात रिपाइं संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून पक्षाची मजबूत बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सन 2014 मध्ये राज्यात दलित मतांच्या आधारावर महायुतीची सत्ता येणार आहे. आमच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजप-सेना युतीची ताकद वाढली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने दलितांचा विश्वासघात केला असून, त्यामुळे आघाडीचा सफाया होणार असल्याचे भाकीत त्यांनी व्यक्त केले. आगामी निवडणुकीसाठी रिपाइंने महायुतीत सहा जागांचा प्रस्ताव मांडला असला तरी, किमान लोकसभेच्या तीन आणि एक राज्यसभेची जागा मिळालीच पाहिजे. लोकसभेसाठी रामटेक, लातूर व दक्षिण मध्य मुंबईवर दावा राहील.

रामटेक न मिळाल्यास वर्धेतही आमच्याकडे चांगला उमेदवार आहे. या जागा न मिळाल्यास महायुतीत राहण्यासंदर्भात आम्हाला पुनर्विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी रिपाइंचे राज्य सचिव भूपेश कुलकर, विदर्भाचे मुख्य संघटन सचिव अशोक नागदिवे, शहराध्यक्ष गजानन कांबळे, युवक आघाडीचे अध्यक्ष गोपाल कदम आदी उपस्थित होते.