आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानपिंगळा मेळघाटातच सर्वाधिक अन् सुरक्षितही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भारतीय पक्षीविश्व तसे संपन्न असून, 1200 पेक्षा अधिक पक्षी प्रजाती देशात सापडतात. त्यातील चार प्रजाती या गत शतकात नामशेष झाल्या असाव्यात, असे समजत जात होते. यापैकीच एक म्हणजे, सातपुड्याचे वैभव असलेला रानपिंगळा असून, त्याची सर्वाधिक संख्या मेळघाटात आहे. त्याचा अधिवास नष्ट होत असल्याने इतर ठिकाणी तो धोक्यात आल्याचे रानपिंगळ्यावर संशोधन करणार्‍या समितीचे प्रमुख डॉ. जयंत वडतकर यांनी माहिती दिली.

नामशेष झालेल्या चार प्रजातींचा योग्यप्रकारे शोध घेतल्यास त्या पुन्हा सापडू शकतील, असा विश्वास देशातील थोर पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांना होता. यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नही केले होते. त्याच प्रयत्नातून त्यांच्या हयातीत जॉर्डनचा कोर्सर या पक्ष्याचा पुन्हा शोध लागला होता. यादीतील दुसरा नामशेष पक्षी म्हणजे फॉरेस्ट आऊलेट अर्थात रानपिंगळा. ज्याचा नव्याने सन 1997 मध्ये अमेरिकी पक्षी अभ्यासक पामेला रासमुसेन, डेव्हिड अबॉट व बेनकिंग यांनी शोध लावला अन् भारतातून नामशेष झालेली दुसरी पक्षी प्रजाती सापडली.

विशेष म्हणजे या पक्ष्याच्या शोधात खुद्द डॉ. सलीम अली 80 च्या दशकात मेळघाटच्या जंगलात येऊन गेले होते. सन 1997 मध्ये नंदुरबार जिल्हय़ातील शहादाच्या जंगलात रानपिंगळा पुन्हा आढळून आला. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेत विविध संस्थांनी व अभ्यासकांनी संशोधन प्रकल्प राबवून त्याच्या अस्तित्वावर प्रकाश टाकला. त्यानुसार रानपिंगळा सध्या मेळघाटचे जंगल, यावल अभयारण्य (जळगाव), तळोदा, तोरणमाळचे जंगल, तसेच मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर व खंडवा या जिल्हय़ातील जंगलात आढळतो. रानपिंगळा हा छोट्या आकारातील घुबड प्रकारातील पक्षी असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, दिवसा वावरणारा एकमेव आहे.सध्या या पक्ष्याच्या अस्तित्व व विस्ताराबाबत जाणून घेण्यासाठी अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था, मुंबईची प्रसिद्ध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसहीत महाराष्ट्र तथा मध्य प्रदेशातील सातपुड्यातील जंगलात शोध प्रकल्प राबवत आहे. याद्वारे आतापर्यंत बरीच महत्त्वपूर्ण माहिती हाती आली असून, या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जयंत वडतकर यांनी त्याविषयी माहिती दिली.

रानपिंगळा क्रिटिकली एन्डेन्जेर्ड
मात्र, त्यांना शोधमोहिमेत तो सापडला नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरात मात्र रानपिंगळा चांगल्या संख्येत आढळला आहे. आतापर्यंत 50 पेक्षाही जास्त पक्षी आढळले असल्याचे डॉ. वडतकर म्हणतात. रानपिंगळा वाचवण्यासाठी योग्य जनजागृती, प्रचार-प्रसिद्धी व्याघ्र प्रकल्पामार्फत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन नेटवर्कच्या यादीत रानपिंगळा हा क्रिटिकली एन्डेन्जेर्ड म्हणजेच संपण्याचा ज्वलंत धोका असलेल्या यादीत समाविष्ट असून, वन्यजीव संवर्धन कायदा 1972 च्या शेड्युल 1मध्ये आहे.

हवा राज्य पक्ष्याचा दर्जा
सन 2010 मध्ये अमरावती येथे झालेल्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था, अमरावतीच्या वतीने रानपिंगळ्याला राज्य पक्ष्याचा दर्जा देण्याचा ठराव घेण्यात आला होता. अशीच मागणी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने रेटून धरली होती. सध्या हरियल पक्ष्याला राज्य पक्ष्याचा दर्जा प्राप्त आहे. मात्र रानपिंगळा त्यापेक्षा दुर्मिळ आहे.