आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : नवोदयच्या प्राचार्यांना १० महिन्यांत ९ नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जवाहर नवोदय विद्यालयातील मुलींच्या विनयभंग प्रकरणाने राज्य हादरले आहे. या प्रकरणाला नवनवीन कांगोरे असल्याचे समोर येत आहे. नवोदय केंद्रीय विद्यालयाचे सहायक आयुक्त आर. एन. राजू यांच्या समितीने शनिवारी जाबजबाब नोंदवणे सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, अनियमितताप्रकरणी प्राचार्यांना मे ते मार्चपर्यंतच्या १० महिन्यांमध्ये ९ नोटिसा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनीही मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्देशावरून मुलींचे जबाब नोंदवले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयातील मुलींच्या विनयभंगप्रकरणी ३१ मार्च रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पालकांनी दोन शिक्षकांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. पालकांचा वाढता दबाव पाहून प्राचार्य आर. ए. सिंग यांनी शिक्षक राजन गजभिये व शैलेश रामटेके यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून दोन्ही शिक्षक फरार होते. या दोघांनाही पोलिसांनी नागपूरहून अटक केली होती. गत काही महिन्यांपासून जवाहर नवोदय विद्यालय वादाच्या भोवऱ्यात आहे. या विद्यालयामध्ये कधी नव्हे १० महिन्यांत सहायक आयुक्तांना ९ वेळा दखल घ्यावी लागली आहे. सर्वात जास्त तक्रारी शिक्षकांचा अंतर्गत कलह प्रकरणात आहेत.

तिन्ही शिक्षक कोठडीत : जवाहर नवोदय विद्यालयातील मुलींच्या विनयभंग प्रकरणातील तिन्ही शिक्षकांना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. राजन गजभिये, शैलेश रामटेके या दोघांना पोलिसांनी मारहाण केल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितल्यामुळे न्यायालयाने दोघांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन एक दिवस कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले.तर संदीप लाडखेडकर या शिक्षकाला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुलींच्या, प्राचार्याच्या व महिला बालकल्याण समितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींशी अभद्र व्यवहार करणाऱ्या राजन गजभिये, शैलेश रामटेके व संदीप लाडखेडकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यानंतर गजभिये व रामटेके हे दोघेही फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. या वेळी दोघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यांना दुपारी प्रथम श्रेणी जिल्हा न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गजभिये व रामटेके यांनी न्यायालयाकडे पोलिसांच्या मारहाणीचा पाढा वाचल्यानंतर न्यायालयाने दोघांच्याही वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एका दिवसासाठी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर तिसरा आरोपी संदीप लाडखेडकर यास ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अंतर्गत राजकारणासाठी मुलांचा वापर सहन करणार नाही -सहायक आयुक्त आर. एन. राजू
विद्यालयामध्ये शिक्षकांचे अंतर्गत कलह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलींवर अन्याय होत असेल, तर तोही खपवून घेतल्या जाणार नाही. दिल्ली येथून माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सी. व्ही. प्रमिला, एन. एस. रामलिंगम यांचा समावेश आहे.
आम्ही सकाळपासून मुलींचे बयाण घेत आहोत. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाईल. शिक्षकांच्या अंतर्गत राजकारणासाठी जर मुलींचा वापर होत असेल, तर तो सहन करणार नाही. सर्व प्रकरणांमध्ये प्राचार्याची भूमिका संशयास्पद असल्याचे वरकरणी दिसून येत आहे. चौकशीमध्ये जर ते सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई ही निश्चित आहे, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे सहायक आयुक्त राजू म्हणाले.
१८ मुलींच्या तक्रारीवरून लाडखेडकरवर गुन्हा

शारीरिक शिक्षक संदीप लाडखेडकर याच्याविरुद्ध १८ मुलींनी तक्रार केली आहे. त्या मुलींचे बयाण घेणे बाकी आहे. शारीरिक शिक्षणाचे धडे देताना असभ्य वर्तन करण्यास भाग पाडणे व विचित्र हावभाव करून लज्जा येईल, असे करण्यास भाग पाडण्याचा आरोप लाडखेडकरवर करण्यात आला आहे. तपासामध्ये आणखी काही समोर येते काय, अजूनही कुणाचा सहभाग आहे काय, याची चौकशी करण्यासाठी सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. प्रवीण चिंचोले यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीतर्फे सरकारी वकील अॅड. मोतीसिंग मोहता यांनी बाजू मांडली.

रामटेके आणि गजभियेला दिला पोलिसांनी चोप

आरोपी शिक्षक रामटेके व गजभिये या दोघांनाही पोलिसांनी नागपूर येथून अटक केली होती. त्यांना सकाळीच अकोला येथे आणले पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सकाळीच जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा व शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यानी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठले. या वेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे.
संदीप लाडखेडकर निलंबित

संदीप लाडखेडकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर नवोदय प्रशासनाचे सहायक आयुक्तांनी लाडखेडकर यास निलंबित केले आहे. संदीप लाडखेडकरवरसुद्धा दोन्ही शिक्षकांसारखेच आरोप करण्यात आले आहेत.
प्राचार्यांची मुलगी राहिली होती परीक्षेपासून वंचित

प्राचार्य यांची मुलगी याच विद्यालयामध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिकत होती. सतत गैरहजर राहत असल्यामुळे परीक्षेसाठी तिची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी होती. त्या वेळी पुणे येथील कार्यालयामध्ये नियमानुसार प्राचार्यांच्या मुलीला परीक्षेस कसे बसू देता येईल, असा पवित्रा त्या वेळी रसायनशास्त्राचे शिक्षक गजभिये व रामटेके यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दोन शिक्षक आहेत उपप्राचार्यांच्या शर्यतीत

उपप्राचार्यपदाच्या शर्यतीमध्ये आरोपी शिक्षक गजभिये होता. तसेच त्याला प्रतिस्पर्धी म्हणून एका महिला शिक्षिकेचा पती आहे. या विद्यालयात दोन गट असून, प्राचार्यांच्या गटातील सदर महिला शिक्षक असल्यामुळे त्यांच्यात व आरोपीत नेहमी खटके उडायचे. विशेष म्हणजे, या महिला शिक्षिकेच्या अखत्यारित मुली येतात.
संदीप लाडखेडकरच्या बाजूने उभे राहिले होते पालक

३१ मार्च रोजी नवोदय विद्यालयातील ३० ते ३५ पालक सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. या वेळी दोन ते तीन पालकांनी तक्रारीमध्ये शिक्षक संदीप लाडखेडकर यांनाही आरोपी करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्या वेळी लाडखेडकर यांना तक्रारीत गोवणार असाल, तर आम्ही पोलिसात तक्रारच करणार नाही, अशी भूमिका घेऊन पालक लाडखेडकर यांच्या बाजूने उभे राहिले होते.