आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधापत्रिकाधारकांना चार महिन्यांपासून साखर मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना चार महिन्यांपासून साखर वाटप झालेली नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारक संताप व्यक्त करत आहेत. साखर कारखान्यांची मनमानी लाभार्थ्यांच्या मुळावर उठत आहे. साखर मिळत नसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.

जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानातून दारिद्रय़रेषेखालील व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना साखरच मिळत नाही. अकोला जिल्ह्यात ज्या साखर कारखान्यांना साखर पुरवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांनी साखरेचा पुरवठा केलेला नाही. परिणामी, शिधापत्रिकाधारकांना दसरा व दिवाळी सणसुद्धा साखरेविना साजरा करावा लागला होता. जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 205 शिधापत्रीकाधारक आहेत. तर शहरात अंत्योदय व बीपीएलचे 7 हजार 765 शिधापत्रिकाधारक असून, त्यांना प्रती व्यक्ती 500 गॅ्रम साखर देण्यात येते. पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाकडे चार महिन्यांपासून साखर मिळाली नसल्याच्या तक्रारी व पत्रव्यवहार केला आहे. परंतु, यावर शासनानेसुद्धा कोणतीच दखल घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन व जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात उपाययोजना करून शिधापत्रिकाधारकांना साखर उपलब्ध द्यावी, अशी मागणी होत आहे.

या कारखानदारांनी केला नाही पुरवठा
साखर पुरवठय़ाची जबाबदारी सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील तिल्हे येथील सिद्धनाथ शुगर लिमिटेड, ऑक्टोबरमध्ये पिंपळनेरच्या विठ्ठल शुगर लिमिटेड व सुभाषनगरच्या लोकमंगल इंडस्ट्रिज, नोव्हेंबरमध्ये लोकमंगल शुगर, कवठा येथील इथेनाल भंडार व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबच्या नॅचर शुगर इंडस्ट्रिज लिमिटेडवर होती. मात्र, त्यांनी पुरवठा केला नाही.

पत्रव्यवहार करण्यात आला
चार महिन्यांपासून अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना साखर मिळाली नाही. याबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी.