आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त धान्य दुकानदाराने केली धान्याची अफरातफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - तालुक्यातील बेसा येथील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणारे धान्य शहरातील एका खासगी व्यापार्‍याला विकून अफरातफर केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकारात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील बेसा येथील स्वस्त धान्य दुकानदार दादाजी जनार्दन वाघमारे याने निवली येथील लाभार्थ्यांना मिळणारा 44 हजार रुपये किमतीचा 21.75 क्विंटल गहू शुक्रवारी गोदामातून उचल करून वाहनात भरला व वाहन निवली येथे न नेता सरळ शहरातील एका बड्या दुकानदाराच्या दुकानात संपूर्ण धान्यसाठा उतरवला़ या प्र्रकाराची कुणकुण तहसीलदार रंजित भोसले यांना लागताच त्यांनी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळावर धाड मारून पंचनामा केला. त्यात वाघमारे या स्वस्त धान्य दुकानदाराने धान्याची अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले़ यावरून पुरवठा निरीक्षण अधिकारी दिगंबर जयराम गोहोकार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून दादाजी वाघमारेविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कलम 2, 7 नुसार गुन्हा नोंदवला आहे़ या प्रकारात मोठे धान्य तस्कर गळाला लागण्याची शक्यता आहे़

धाडसत्र राबवणे गरजेचे
पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार सुरूच आहे़ दोन दिवसांपूर्वी साखर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने धान्याची व रॉकेलची अशीच अफरातफर केली. मात्र, येथील अधिकारी व गावपुढार्‍यांनी संगनमत करून हा प्रकार असाच दडपल्याची गावात चर्चा आहे तसेच शहरालगतच्या गणेशपूर येथील स्वस्त धान्य दुकानाचा कारभार शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाकडे आहे. गरिबांना मिळणारे रॉकेल सदर व्यापारी कोळसा बाजारात ट्रॅक्टरमालकांना विकत असल्याची माहिती आहे़ धान्य संपल्याचे सांगून ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करण्यात मग्न आहेत़ त्यामुळे तालुक्यात सर्वच ठिकाणी धाडसत्र राबवणे गरजेचे झाले आहे.
उचल नसताना धान्याचे वाटप
तालुक्यातील बेसा येथील स्वस्त धान्य दुकानदाराने ज्या स्वस्त धान्य दुकानदाराला माल विकला त्या दुकानदाराने या महिन्यात धान्यसाठ्याची उचलच केली नसल्याची माहिती आहे़ मात्र, लाभार्थ्यांना त्यांच्या दुकानातून धान्याचे वाटप होत आहे़ मग धान्यसाठा उपलब्ध झालाच कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ या प्रकारात धान्य घोटाळा करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा कयास वर्तवण्यात येत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकारी याबाबत मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे़