आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जीवनदायी'चे रुग्ण "रेफर टू खासगी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून ग्रामीण जनता अनभिज्ञ असून, गंभीर स्वरूपाच्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच ‘रेफर टू खासगी रुग्णालय’ अशी कार्यरत प्रशासनाची भूमिका असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. परिणामी, शासनाच्या जीवनदायी योजनेचा मात्र बट्ट्याबोळ होत आहे. वरिष्ठांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने दुर्बल घटकातील जनतेला आरोग्यसेवा तातडीने उपलब्ध करण्याच्या हेतूने राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यानि्वत केली आहे. या योजनेत गरीब दुर्धर असलेल्या आजारावर मोफत उपचार करण्यात येतो. परिसरात कोळसा खाणी व कोळसा डेपोच्या प्रदूषणामुळे बहुतांश जनतेला दुर्धर आजारांनी ग्रासले आहे. या खाणीमध्ये वाहने मोठ्या प्रमाणात चालत असल्याने अपघातसुद्धा होत आहेत; परंतु ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासन आलेल्या रुग्णांना ‘रेफर टू खासगी रुग्णालय’ अशी भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने येथील सुगम मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे. या रुग्णालयात आलेल्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बघता येथील डाॅक्टर्स स्वत:हून रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देत असल्याची परिस्थिती आहे. मात्र, याउलट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशासन ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत रुग्णांना चंद्रपूर येथील शासकीय अथवा खासगी रुग्णालयात रेफर करीत आहेत. विषारी द्रव्यप्राशन केलेले, अपघात झालेले रुग्ण चंद्रपूरला हलवल्यानंतर रस्त्यातच कित्येक जण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. गावात शासनाची सुविधा उपलब्ध असताना केवळ रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराने रुग्णांना शहराबाहेर अथवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यात सर्वसामान्यांना जबर फटका बसत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

रुग्णांना अपात्र ठरवण्यात इन्शुरन्स कंपनी अग्रेसर
शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत महत्त्वाची भूमिका निभावणारी इन्शुरन्स कंपनी रुग्णांना अपात्र ठरवण्यात अग्रेसर आहे. परिणामी, राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी नियुक्त केलेल्या रुग्णालय प्रशासनाला सर्वसामान्यांना न्याय देणे कठीण झाले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊ

सर्वसामान्य जनतेला शहरातच उपचाराची सुविधा मिळण्यासाठी मी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करणार आहे. सुविधा उपलब्ध असल्यास रुग्णांना त्याचा फायदा करून देण्यात येईल.
डाॅ चंद्रशेखर खांबे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वणी.