आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' कारवाईनंतरच होणार दुरुस्ती, महापालिका कर्मचा-यांचा जीव धोक्यात घालणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैध नळजोडण्या तोडल्यानंतर पुन्हा अवैध नळजोडण्या घेणे, त्यानंतर व्हॉल्व्ह नादुरुस्त करणे, हा प्रकार दादागिरीचा आहे. पोलिस प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे समाजकंटकांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करता येणे अशक्य आहे. यापुढे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी घेतली आहे.
मुख्य जलवाहिनीवर बार्शिटाकळी येथे २.३ किलोमीटर जलवाहिनीवर नागरिकांनी दोन ते तीन इंची अवैध नळजोडण्या घेतल्या होत्या. अक्षरश: मुख्य जलवाहिनीची चाळणी झाली होती. याचा विपरीत परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत होता. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अवैध नळजोडण्यांवर कारवाई केली. परंतु, नागरिकांनी पुन्हा अवैध नळजोडण्या घेतल्या. त्यानंतर पुन्हा प्रशासनाने अवैध नळजोडण्यांवर कारवाई केली. सात फेब्रुवारीला झालेल्या अवैध नळजोडणी कारवाईदरम्यान संतप्त जमावाने महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकावर दगडफेक केली. यात काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर काही समाजकंटकांनी व्हॉल्व्ह निकामी केला. हा व्हॉल्व्ह दुरुस्त केल्यानंतर या दुरुस्त केलेल्या व्हॉल्व्हसह पाच व्हॉल्व्ह निकामी केले. हा प्रकार सर्रासपणे दादागिरीचा आहे. व्हॉल्व्हवर चक्क घनाने घाव घालून निकामी केले जाते. हा प्रकार रात्री होतो. त्यामुळे पेट्रोलिंगच्या वेळी हा प्रकार निदर्शनास येत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्यानेच समाजकंटकांना मोकळे रान मिळालेे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय दुरुस्तीचे काम पूर्ण होणार नाही. यापुढे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे, अशी माहिती उपायुक्त मडावी यांनी दिली.
चार प्रभागांत लिकेजेस नसल्याचा दावा-
अधिका-यांनी दिलेल्या अहवालात प्रभाग क्रमांक ९, २३, २६, २९ या प्रभागांत एकही लिकेज नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक-९ च्या नगरसेविका निकहत अफसर कुरेशी यांनी त्यांच्या प्रभागात लिकेजेस नसल्याची बाब मान्य केली आहे.
तक्रारी देऊन थकलो
प्रभागक्रमांक-२९ च्या अनेक भागांत िलकेजेस आहेत.तोंडी चर्चाही केली. तक्रारी देऊन थकलो. मात्र, लिकेजेस दुरुस्त केले नाही. हा अहवाल दिशाभूल करणारा आहे.'' गजाननगवई, नगरसेवक
चुकीचा अहवाल
प्रभागक्रमांक- २६ मध्ये अनेक ठिकाणी लिकेजेस असून, या प्रभागात लिकेजेस नसल्याचा दावा करणे चुकीची बाब आहे. गल्लीत फिरून अहवाल तयार केल्याचे दिसते. त्यामुळे हा अहवालच चुकीचा आहे.'' दिलीपदेशमुख, नगरसेवक
दुरुस्तीच्या कामास प्रारंभ
दरम्यान,पाच व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. व्हॉल्व्हचे नटबोल्टवर घनाचे घाव घातल्याने व्हॉल्व्ह उघडण्यासाठी कटरचा वापर करावा लागला. पाचही व्हॉल्व्हच्या दुरुस्तीच्या कामास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.
पाणी विकत घ्यावे लागते
गतसात दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. नागरिकांनी साठवण केलेले पाणी आता संपल्याने नागरिकांना चक्क पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहराच्या काही भागात पाणी विकत घ्यावे लागत असल्याने पाण्याचे भाव वधारले आहे. ३० ते ३५ रुपयांना मिळणारी पाण्याची कॅन आता ४० रुपयांची झाली आहे.