अकोला - कृषीविद्यापीठातील संशोधक जे संशोधन करतात, ते कागदावरच राहते. हे संशोधन जोपर्यंत शेतक-यांपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत
आपल्याकडील शेतीचा विकास होणार नाही. त्यामुळे कागदावरचे संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी रोजी कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात पार पडला. या वेळी १,०५३ स्नातकांनी पदवी स्वीकारली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे होते. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, माजी कुलगुरू प्रा. किसन लवांदे, कुलसचिव ज्ञानेश्वर भारती यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येचा प्रश्न नेहमीच भेडसावतो. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. जलयुक्त शिवार अभियान हा त्यातीलच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शेतमालाची उत्पादकता वाढल्याशिवाय हमीभाव मिळू शकणार नाही, यासाठी शेतक-यांनीकापसासोबत इतर पिकांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. कृषी विद्यापीठामार्फत आतापर्यंत हजारोंच्या संख्येने संशोधक डॉक्टरेट होतात. मात्र, याचा कितपत फायदा विदर्भाला किंवा राज्यातील शेतक-यांना होतो, ही चिंतनाची बाब आहे. त्यामुळे डॉक्टरेट मिळवलेल्या संशोधकांनी आपले संशोधन कागदावर राहू देता शेतक-यांपर्यंत न्यावे.
प्रास्ताविकातून कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी विद्यार्थी संशोधन विस्तार विभागाच्या प्रगतीचा लेखाजाेखा मांडला. शासनातर्फे दिल्या जाणा-या सह्याद्री भूषण पुरस्कारामध्ये विदर्भातील शेतक-यांनी सहभाग घेतला. तसेच पंतप्रधानांसमाेर झालेल्या परेडचे नेतृत्व विद्यापीठाच्या तेजस्विता बडगुजरने केल्याचे त्यांनी सांगितले.
या समारंभाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार चैनसुख संचेती, उपमहापौर विनोद मापारी, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, डॉ. बळवंत बथकल, डॉ. व्यंकटराव मायंदे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंग उपस्थित होते.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वेधशाळा
हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी राज्यात हजार हवामान वेधशाळांची निर्मिती केली जाणार आहे. या वेधशाळा प्रामुख्याने ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असतील. जेणेकरून शेतक-यांना पावसाचा अंदाज घेता येईल. याशिवाय १० लाख शेतक-यांना उत्तम बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृषी विभागाचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.