आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकान परवान्याचे धोरण बदलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने कुटुंबाच्या व्याख्येसंदर्भात नवीन धोरण ठरविले आहे. केरोसीन आणि स्वस्त धान्य दुकानाचा वारसा हक्क विवाहित मुलींसह सावत्र मुलांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतचा अध्यादेश नव्याने पारित करण्यात आला आहे.

स्वस्त धान्य दुकानासाठीच्या परवानाधारकाचे वारस ठरविण्याकरिता आणि केरोसीन दुकानांसाठीचे वारस ठरविण्याकरिता असे दोन वेगवेगळे शासनाचे आदेश होते. दोन्ही शासन निर्णयात वेगवेगळ्या वारसांना वारसाहक्क नमूद केल्याने दुकान हस्तांतरित होत असताना भेदभाव होत होता. आता नव्या सर्वसमावेशक आदेशानुसार या दोन्ही बाबतीत एकसमानता आणण्यात आली आहे.

किरकोळ केरोसीन परवानाधारक, हॉकर्स, अर्धघाऊक परवानाधारक यांच्या मृत्यूनंतर परवानाधारकांच्या वारसाच्या नावे परवाना वर्ग करताना कुटुंबाच्या व्याख्येबाबत नवीन धोरण ठरविले आहे. परवानाधारकाची पत्नी अथवा पती, सज्ञान मुलगा, सज्ञान मुलगी, सज्ञान अविवाहित मुलगी, परवानाधारकावर अवलंबून असणारे आई-वडील, सून, दत्तकपुत्र, परवानाधारकावर अवलंबून असणारी घटस्फोटीत मुलगी यांचा समावेश या व्याख्यात करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशात किरकोळ केरोसीन परवाना आणि रास्तभाव दुकान परवाना वारसाने वर्ग करताना कुटुंबाच्या व्याख्यात विवाहित मुलीचा समावेश केला आहे. या सुधारित शासन निर्णयात परवानाधारकाच्या मृत्यूनंतर वारसाच्या नावे परवाना वर्ग करताना कुटुंबाची व्याख्यान बदलविली आहे. पुरुष परवानाधारकाच्या बाबतीत एक अनेक पत्नी, यात न्यायिक फारकत घेतलेल्या पत्नीचाही समावेश केला आहे. महिला परवानाधारकाच्या बाबतीत पतीचाही समावेश करण्यात आला आहे. यासह अवलंबित आई-वडील, सज्ञान मुले-मुली, सावत्र, दत्तक, अविवाहित मुले-मुली, घटस्फोटीत मुली, सून, भाऊ, अविवाहित बहिणी, विधवा बहिणी, सज्ञान सावत्र बहिणी आदींचा समावेश करण्यात आला आहे. वंचित घटकांना न्याय मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...