आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा फटका; दोन दिवसांपासून कामकाज ठप्प; अनेक कामे खोळंबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महसूल कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचार्‍यांनी 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शनिवारी या आंदोलनाचा फटका तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना बसला. यामुळे नागरिक चांगलेच वैतागून गेले होते. प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न नेहमीच कर्मचार्‍यांतर्फे होतो. शुक्रवारपासून तसाच प्रयत्न महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून सुरू आहे. महसूल कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असल्या, तरी नागरिकांना आज त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 ऑगस्ट रोजी दिवसभर धरणे दिले. या वेळी कर्मचार्‍यांनी निर्दशने दिली. या आंदोलनात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयामधील महिला व पुरुष सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले दिसून आले. तहसील नेहमी आपल्या विविध कामांसाठी नागरिकांनी धाव घेतली. मात्र, तहसील कार्यालयातील कोणत्याच विभागात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन
संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. हे आंदोलन राज्यव्यापी असल्याने आता मागे हटण्याचा प्रश्न नाही. नागरिकांना त्रास देण्याचा किंवा प्रशासनाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. पण, आमच्याही मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षा आहे. अरुण इंगळे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.
हे तर नेहमीचेच
निवडणुका जवळ आल्या की, हा कर्मचार्‍यांचा फंडा असतो. नागरिकाचा कुठलाही विचार या ठिकाणी होत नाही. केवळ आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊल कर्मचारी उचलताना दिसतात. मला निवडणूक विभागात काम होते. पण, आज ते होऊ शकले नाही. नीलेश इंगळे, अकोला.
गरिबाचा कुणी वाली नाही
भाऊ, रेशन कार्ड काढायला आलो. पण, टेबलावर कुणीच दिसत नाही. गेल्या आठवडाभरापासून फिरत आहे. लिपिक कुठे जातो काही कळत नाही. पुरवठा विभागात 11.30 वाजेपासून लिपिकाची वाट पाहत आहे. लिपिक कुठे गेला कुणी सांगायला तयार नाही. अशोक वाळिंबे, जुने शहर.
सेतूचा लिपिकही संपात
सेतू केंद्रावर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज केला. दुपारी 12 वाजेपासून वाट पाहत आहे. आता दुपारचे 3 वाजलेत, तरी अजूनही प्रतिज्ञालेख आला नाही. याठिकाणचा लिपिक संपात सांगण्यात आले. दीपक अढाव, शिवणी.