आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारकांचा लढा अन्यायी व्यवस्थेविरुद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यांचा लढा इंग्रजांविरुद्ध नव्हता, तर अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध होता. इंग्रज देश सोडून गेले, तरी त्यांची व्यवस्था अद्यापही कायम आहे. क्रांतिकारकांच्या लढय़ामागील तत्त्व आपण समजू शकलो नाही, अशी खंत भगतसिंग यांचे पणतू अभितेजसिंग संधू यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात शुक्रवार, 21 मार्चला आयोजित ‘वंदन क्रांतिकारीयों को’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
क्रांतिकारी गौरव समितीतर्फे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अभितेजसिंग संधू यांनी भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, देशात कोणी एवढे र्शीमंत होऊ नये की, तो गरिबाला विकत घेईल आणि कोणी एवढे गरीब असू नये की, त्याच्यावर स्वत:ला विकण्याची वेळ यावी, अशी व्यवस्था देशात कधीच असू नये, असे भगतसिंगांचे स्वप्न होते. मात्र, सध्या देशात असेच वातावरण आहे. देशातील प्रत्येक युवक हा भगतसिंगांचा वारस आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. जातीभेद, धर्मभेद, राजकीय पक्ष यांच्यातील वाद, स्वार्थाचा त्याग करून एकत्र येण्याची गरज आहे. भगतसिंग यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्याचे अर्धवट कार्य युवकांना करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सशस्त्र व नि:शस्त्र क्रांतीमुळे मिळाले, असे मत इंदूरचे अनिल ओक यांनी व्यक्त केले. क्रांतिकारकांनी दिलेला लढा आणि अहिंसेच्या माध्यमातून देण्यात आलेला लढा दोन्ही एकमेकास पूरक होता. केवळ एका लढय़ाच्या बळावर स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले. अनिल ओक यांनी सशस्त्र क्रांतीचा मुद्दा स्पष्ट करताना स्वातंत्र्यवीर सावरकर, मंगल पांडे, सुभाषचंद्र बोस यांचे उदाहरण दिले. दिल्लीचे प्रशांत हरताळकर यांनी युवकांमध्ये असलेले देशप्रेम फक्त दाखवण्यापुरते न राहता, त्याचा खर्‍या अर्थाने देशाला फायदा झाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील यांनी प्रस्तावनेत महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करताना वाद्यांचा गजर नको, तर विचारांचा जागर झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी, तर नीलेश जोशी यांनी आभार मानले. या वेळी शहीद सुखदेव यांचे पणतू भरतभूषण थापर, राजगुरूंचे पुतणे विलास राजगुरू, विष्णू पिंगळे यांचे नातू, निकेश गुप्ता, संतोष पांडे यांच्यासह 12 ते 15 स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.
अनेक संघटनांनी केले स्वागत
अभितेजसिंग संधू, भरतभूषण थापर आणि विलास राजगुरू यांचे शहरातील अनेक संघटनांनी स्वागत केले. संतोष वर्मा, परमजितसिंग घुमन, धीरज शुक्ला, आनंद चौबे, अश्विन पांडे, संजय अग्रवाल, श्याम सावजी, संतोष पांडे, कृष्णा गुरुखुद्दे, गोपाल झापर्डे, कल्पना अग्रवाल, भूषण पिंपळगावकर, निर्मला झुनझुनवाला, मधुकर वानडेकर, संतोष छाजेड, उत्सव सोनालावाला, डॉ. सुभाष भडांगे, गुरुद्वारा प्रबंधक कमिटी यांच्यासह अनेक संघटनांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. ज्योती केडिया यांच्यासह अग्रवाल महिला मंडळातील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या. खालसा ग्रुपतर्फे अभितेजसिंग संधू यांना तलवार भेट देण्यात आली.
शहरातून निघाली मिरवणूक
23 मार्चला देशात शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांचा स्मृतिदिन साजरा होतो. त्यानिमित्त शुक्रवारी शहरात आयोजित ‘वंदन क्रांतिकारीयों को’ कार्यक्रमांतर्गत दुपारी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. लहान उमरी येथील शहीद भगतसिंग चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. जठारपेठ, राऊतवाडी, जवाहरनगर चौक, सिव्हिल लाइन चौक, रतनलाल प्लॉट चौक, टॉवर चौक, दीपक चौक, टिळकरोड, सिटी कोतवाली चौक, गांधीरोड या मार्गाने मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे मिरवणुकीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मिरवणुकीत दुचाकी वाहनांवर स्वार युवक वंदे मातरम् व भारत मातेचा जयघोष करत होते. शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत झाले.