आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Right To Education News In Marathi, Divya Marathi, Student, Akola

मोफत प्रवेशासाठी शाळांची मनमानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राइट-टू-एज्युकेशन कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना पहिल्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी संख्येच्या 25 टक्के मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेळापत्रक आणि पत्र जिल्ह्यातील शाळांना दिले. मात्र, त्या पत्रानुसार शहरातील शाळा प्रवेशप्रक्रिया राबवत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मनमानी पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे.


शिक्षण विभागाने फेब्रुवारी महिन्यामध्ये अल्पसंख्याक शाळा वगळून सर्व शाळांना 25 टक्के मोफत प्रवेशप्रक्रिया राबवण्याबाबतचे पत्र दिले. मात्र, शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार शाळा प्रवेशप्रक्रिया राबवत नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी काही शाळा पालकांची अडवणूक करत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज नसतानाही या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वेठीस धरले जात आहे. याबाबत शिक्षण विभागाच्या अंमलबजावणी अधिकार्‍याकडे चौकशी केली असता, त्यांनी कायद्यात नसले तर काय झाले, आम्ही म्हणू तशी प्रवेशप्रक्रिया राबवू, असे उत्तर दिले. 16 एप्रिलला शाळांनी प्रवेश अर्जाची छाननी करून, शाळांमध्ये याद्या लावणे आवश्यक होते. मात्र, चार-पाच शाळा वगळल्या, तर बहुतांश शाळांनी अद्यापही बोर्डावर याद्या लावल्या नाहीत. अनेक शाळा त्यांच्या सोयीनुसार कायद्याची अंमलबजावणी करत आहेत. कोणत्या शाळांना नियम लागू नाहीत याबाबत शिक्षण विभागाकडे माहिती उपलब्ध नाही.


अजूनही देत आहेत शाळा अल्पसंख्याक प्रमाणपत्र
मोफत प्रवेशप्रक्रियेतून अल्पसंख्याक शाळांना वगळल्याने आम्ही प्रक्रिया राबवणार नाही, असे म्हणून अजूनही काही शाळा शिक्षण विभागात अल्पसंख्याक असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणून देत आहेत. त्या प्रक्रियेतून पळवाट काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे कारण यामागे आहे.


अंमलबजावणी अधिकारी म्हणतात, शाळांनी दिल्या जाहिराती : वंचित घटकातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार 25 टक्के प्रवेशप्रक्रिया राबवताना त्यासंदर्भात शाळांमधील सूचना फलकावर प्रवेशाबाबतचे वेळापत्रक लावणे आवश्यक होते. मात्र, बहुतांश शाळांनी तसे केले नाही. त्यामुळे अनेक पालक पाल्याच्या प्रवेशापासून वंचित आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अंमलबजावणी अधिकार्‍यास यासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले की, शाळांनी योग्य पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवली आहे. त्यांनी वर्तमानपत्रातून दिलेल्या जाहिराती आम्हाला दाखवल्या आहेत. मात्र, यासंदर्भात वास्तव असे आहे की, शाळांनी कोणत्याही जाहिराती दिल्या नाहीत. शिक्षण विभाग शाळांना पाठीशी घालत असल्याचे यावरून दिसून येत आहे.


शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे
प्रवेशप्रक्रिया आदेशानुसार सुरू आहे. नोएल इंग्लिश स्कूलने उशिरा प्रक्रिया राबवली. अनेक शाळांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मोफत प्रवेशाचा कोटा पूर्ण करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. तक्रारी असल्यास पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधावा. सुनंदा भाकरे, प्रभारी विस्तार अधिकारी जिल्हा परिषद (प्राथ.)