आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव सुरू पण खड्डे अन् कचरा कायमच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका प्रशासनाने दिलेले रस्ते दुरुस्तीचे आश्वासन हे पोकळ ठरले आहे. केवळ नेकलेसरोडवर डागडुजी सुरू असून, इतर मार्गावरील खड्डे अद्यापही कायम आहेत तसेच शहरातील कचरादेखील पूर्णत: उचलल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी 3 सप्टेंबरला महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दोन्ही विभागाच्या अभियंत्यांनी दिले होते. 9 सप्टेंबरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या अधिकारातील रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करणार होती, तर 13 सप्टेंबरपर्यंत महापालिका प्रशासन रस्ते दुरुस्त करणार होते. अद्याप शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता दुरुस्तीचे हे काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होते, तसे झाल्याचे चित्र नाही. पावसामुळे या दुरुस्तीच्या कामात व्यत्यय आल्याने गेल्या दोन दिवसांत काम संथगतीने सुरू होते.

दुरुस्तीची कामे लांबली
शहरातील 29 रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक असताना एकाच मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रेल्वे स्टेशन ते अशोक वाटिका, गांधीरोड, टिळकरोड या मार्गांचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यापैकी अनेक रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. एलआरटी कॉलेजरोड, लेडी हार्डिंगरोड, टॉवर चौक ते उमरीरोड हे तीन रस्ते अद्याप दुरुस्त केले नाहीत. 13 सप्टेंबरपर्यंत मनपा दुरुस्ती करणार होती. ती मुदत आता 20 सप्टेंबरपर्यंत पोहोचली आहे. गणपती विसर्जनापूर्वी हे सर्व होणे अपेक्षित असून, प्रशासनाबरोबर पदाधिकार्‍यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे.

दुरुस्तीचे काम सुरू
शहरातील रेल्वेस्थानक ते अशोक वाटिका या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ते काम पूर्ण होईल. मध्यंतरी पावसाच्या व्यत्ययामुळे ही सर्व कामे प्रभावित झाली आहे. पाऊस थांबला की कामांना वेग येईल. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल.’’ सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

रस्त्यावर पॅचिंग सुरू
नेकलेसरोडचे काम सुरू केले आहे. या रस्त्यावर सर्वाधिक खड्डे होते. 30 लाखांची खड्डे दुरुस्ती करण्यात येईल. गणेशोत्सवासाठी असलेल्या सर्व मार्गावरील कामे सुरू आहे. गणेशोत्सवाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांवर पॅचिंग करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी दुरुस्तीचे काम सुरू आहे.’’ अजय गुजर, शहर अभियंता, महापालिका