आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्यांची दुरुस्ती करा, नवे रस्ते बनवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहर तसेच ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, अनेक लोक मृत्युमूखी पडले आहेत. त्यामुळे प्रथम जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करूनच नवीन रस्त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत व ग्रामीण भागातील भारनियमन रद्द करण्याबाबत त्यांनी शनिवारी निवेदन दिले.

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेद्वारे आमदार निधी व खासदार निधीमधून विकासाची कामे केल्या जातात. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. शिवसेनेतर्फे अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या. मात्र, परिणाम झाला नाही. अनेक ठिकाणी अपघातात अनेकजण मृत्युमुखी पडले. मात्र, चांगल्या रस्त्यांसाठी कार्यवाही केली जात नाही. दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यावर कार्यवाही का नाही, याचा जाब संबंधित अधिकार्‍यांना लेखी स्वरूपात विचारावा, प्रथम जुने रस्ते दुरुस्त करावे, त्यानंतरच नवीन रस्त्यांना प्राधान्य देण्यात यावे. बर्‍याच ठिकाणी चांगल्या असलेल्या रस्त्यांवर काम सुरू आहे, ते त्वरित बंद करावे. मागील दोन वर्षांत ज्या कंत्राटदाराने रस्ते तयार केले ते एक वर्षाच्या आत उखडले त्यांच्यावर कार्यवाही करावी, कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा व त्याला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अतिवृष्टीचा मदतनिधी किती आला व कुठे खर्च केला.

सार्वजनिक बांधकाम विभागात आलेल्या निधीचे काय झाले, अशा मुद्दय़ांवर जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही करण्याची मागणी शिवसेनेतर्फे या वेळी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, मंगेश काळे, सुरज भटकर, विठ्ठलराव गावंडे, सुनीता मेटांगे, पांडे, साहेबराव ठाकरे, बिरजू जयस्वाल, हरिभाऊ भालतिलक, नंदा पिल्लेवार, प्रीती काकडे आदी उपस्थित होते.

13 डिसेंबरपासून धरणे
रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून, भारनियमन होत आहे. भारनियमन त्वरित बंद करावे, भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अतिवृष्टीच्या निधीचा जाब द्यावा या व अशा विविध मागण्यांसाठी 13 डिसेंबरपासून शिवसेना व युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आयोजित केले आहे.