आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता सुरक्षा अभियानामध्ये शहराच्या वाहतुकीची ऐसीतैसी वाहतूक विस्कळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिस कमी पडत आहेत. त्याकडे ते गांभीर्याने पाहत नसल्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. सध्या राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. मात्र, या अभियानादरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेल्वेस्थानक ते अशोक वाटिकेदरम्यान नजर टाकली असता, या मार्गावर भरस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारे ऑटो आणि इतर मालवाहू वाहने उभे दिसून आले. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
एकीकडे पोलिस अधीक्षकांचा जिल्ह्यात पोलिसिंग राबवण्याचा प्रयत्न सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात भर म्हणजे शहरात कुठेही वाहतुकीवर नियंत्रण दिसून येत नाही. मुख्य बसस्थानकासमोर असलेल्या दोन्ही प्रवेशद्धारांवर ऑटो उभे राहत असूून, बसस्थानकात प्रवेश करणे जोखमीचे झाले आहे. पोलिस ठाण्यांमधील पोलिसांचे दंडाचे पावती पुस्तक काढून घेण्यात आल्यामुळे आता वाहतूक पोलिसांच्या हातात पावत्यांशिवाय काहीही दिसून येत नसून, त्यांचे वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत आहे.

कुठे काय दिसून आले
शुक्रवारीसकाळी ११ वाजता बसस्थानक चौकामध्ये दोन वाहतूक पोलिस उभे होते. त्यांच्या पाठीमागे स्वराज्य भवनसमोर रस्त्याच्या मध्ये ऑटो उभे होते. ते रस्त्यावर उभे राहून प्रवासी भरत होते. गांधी जवाहर बागेसमोर ऑटोंसाठी पार्किंग स्थळ आहे. मात्र, त्या स्थळाच्या बाहेर रस्त्यावर ऑटो बेशिस्तीमध्ये उभे होते, तर टॉवर चौकामध्ये उमरीकडे जाणारा मार्ग ऑटोंनी अरुंद केला होता. त्याकडे पाहत राहण्याशिवाय पोलिस काहीही करत नव्हते.

रेल्वेस्थानक चौकामध्ये वाहतूक पोलिस नसल्यामुळे येथे विस्कळीतपणा दिसून आला. या ठिकाणी तर चक्क रस्त्याच्या मध्ये ऑटो थांबले होते आणि प्रवासी भरत होते. रस्ता सुरक्षा पंधरवड्यामध्ये वाहतुकीबाबत नागरिकांना प्रबोधन करण्याची जबाबदारी आरटीओ पोलिसांची असते. त्याचप्रमाणे ऑटोचालकांना नियमांबाबत मार्गदर्शन करणे अनिवार्य आहे. अभियान राबवायचे म्हणून राबवले जात आहे.