आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकीदारांना मारून, कपडे काढून कोंडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रीय महामार्गावरील शाकंबरी इंडस्ट्रिजमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. या वेळी त्यांनी इंडस्ट्रिजच्या तीन पहारेकर्‍यांना मारहाण करून त्यांचे कपडे काढून घेतले व त्यांना नग्नावस्थेत शौचालयामध्ये कोंडले. हा थरार शनिवारी रात्री 12 वाजेपासून सकाळी 5.15 वाजेपर्यंत सुरू होता. चोरट्यांनी 39 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

शाकंबरी इंडस्टिजमध्ये सरकीपासून ढेप तयार केल्या जाते. रात्रीच्या सुमारास एका सुपरवायझरसह दोन चौकीदार तैनात होते. त्यात दिनकर प्रल्हाद पाकधुने, बाळकृष्ण तोताराम रावणकर आणि अनिल केशवराव ढोले यांचा समावेश होता. पाच ते सहा दरोडेखोर रात्री 12 वाजता तोंडाला काळे रुमाल बांधून इंडस्ट्रिजमध्ये शिरले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून तिन्ही चौकीदारास धमकावले व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका चौकीदाराकडून त्यांनी कंपनीच्या महत्त्वाच्या चाव्या घेतल्या व 11 केव्हीचे ट्रान्सफार्मर खोलण्याचा प्रयत्न केला. चौकीदारांनी पळून जाऊ नये, म्हणून त्यांनी तिन्ही चौकीदारांचे कपडे काढून त्यांना निर्वस्त्र केले व निर्दयतेने कंपनीच्या शौचालयामध्ये रात्रभर कोंडून ठेवले. चोरट्यांनी टेक्समो कंपनीचे मोटारपंप, इन्व्हर्टर, दोन बॅटर्‍या, वेल्डिंगचे केबल, ड्रील मशीन चोरून नेले. याप्रकरणी संतोष साहेबराव रामेकर यांनी डाबकीरोड पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डाबकीरोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार भारत राक्षसकर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.
जीव मुठीत घेऊन रात्र काढली शौचालयात : सकाळी चोरट्यांनी पळ काढल्यानंतर शौचालयामध्ये डांबलेल्या तिघांना बाहेर काढले नाही. चोरटे गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शौचालयाची जाळी तोडून, बाहेर उड्या टाकल्या. त्यानंतर त्यांनी इतरत्र कपड्यांचा शोध घेतल्यानंतर बाजूलाच कपडे सापडले. त्यांनी कपडे घातल्यानंतर इंडस्ट्रिजच्या मालकाला कळवले.
तांब्याची तार लांबवण्यास चोरटे ठरले अपयशी :
इंडस्टीजमध्ये ढेप आणि सरकी असल्यामुळे ते चोरुन नेण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. तर 11 केव्ही ट्रान्सफारमरमधील तांब्याची तार लंपास करण्याचा त्यांचा बेत होता. रात्रपाळीच्या सुपरवायझरला चोरट्यांनी दम भरला. नंतर त्याला शोरुममध्ये नेले. शोरुमचे कुलूप तोडले आणि आतील कपाटातून चाव्या काढल्या. त्यानंतर सुपरवायझारला मशीनरुममध्ये नेले तेथील 20 ते 25 पाने घेतले आणि त्यास व त्याच्या दोन साथीदारांना शौचालयामध्ये कोंडले. चोरट्यांनी या पान्यांच्या आधारे ट्रान्सफारमरची वरची प्लेट उघडली होती. मात्र सकाळ होत असल्यामुळे आणि मिशन फत्ते होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनी केली घटनेची पाहणी : घटनेची माहिती डाबकीरोड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर सकाळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, श्वानाने बाजूलाच असलेल्या दुसर्‍या इंडस्ट्रिजपर्यंत धाव घेतली. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यास त्यांना अपयश आले.
एक लाख 60 हजारांचा माल लंपास
अकोला
- येथील हनुमाननगरातील एका घरात कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व मुद्देमालासह एक लाख 62 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 17 ऑगस्टला उघडकीस आली. 15 ऑगस्ट रोजी प्रभाकर एकनाथ घोळके कुटुंबीयासह श्रीरामपूर येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते. जावई रामभाऊ मुडे यांना घोळके यांनी घरात झोपण्याचे सांगितले होते. मात्र, रामभाऊ मुडे यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी डाव साधला. दुसर्‍याच दिवशी प्रभाकर घोळके यांचा मुलगा हेमंत यवतमाळहून घरी आल्यानंतर त्यांना समोरचे दार बंद दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना सामान अस्ताव्यस्त आढळून आले. तसेच खिडकीचे गज तुटलेले दिसले. त्यांनी वडिलांना माहिती दिल्यानंतर ते लगेच अकोला येथे रविवारी पोहोचले. सोने आणि रोख रकम बघितली असता त्यांना घरात ठेवलेल्या 60 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या त्याची किंमत एक लाख 20 हजार रुपये, 20 ग्रॅमचा एक कंठमणी त्याची किंमत 40 हजार रुपये आणि दोन हजार रुपये रोख आदी रक्कम चोरी गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी घोळके यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात तक्रार दिली.