आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भरदुपारी दोन घरफोड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दुर्गा चौकातील विजयश्री अपार्टमेंटमध्ये भरदुपारी दोन घरे फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अपार्टमेंटमधील तिसर्‍या फ्लॅटचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. भरदुपारी घरफोड्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दुर्गा चौकातील विजयश्री अपार्टमेंटमधील तिसर्‍या माळ्यावर रवींद्र भुईभार कुटुंबासह आज दुपारी आदर्श कॉलनीतील नातेवाइकाकडे गेले होते. याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी त्यांच्या घरातील लाकडी व लोखंडी असे तीन कपाट फोडून मुद्देमाल लंपास केला. नेमका किती मुद्देमाल लंपास झाला, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. विजयश्री अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील यू. पी. पाटील यांचाही फ्लॅट चोरट्यांनी फोडला. सेवानिवृत्ती विस्तार अधिकारी यू. पी. पाटील हे आपल्या कुटुंबासह नागपूर येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील मुद्देमाल लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यू. पी. पाटील नागपूरवरून अद्यापपर्यंत आले नसल्याने नेमका किती मुद्देमाल लंपास झाला, हे कळले नाही. याच अपार्टमेंटमधील गणेश थोरात यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, ते कुलूप तुटले नाही. या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पूर्वी एकाच फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर रात्री दुसर्‍या फ्लॅटमध्येही चोरी झाल्याचे अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांच्या लक्षात आले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

1 ते 6 च्या दरम्यान कार्यभाग साधला
चोरट्यांनी दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान आपला कार्यभाग साधला. या वेळेत रवींद्र भुईभार बाहेर होते. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यादरम्यान चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून तिसरा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. दोन फ्लॅटमधील मुद्देमालावर हात साफ करून चोरट्यांनी पोबारा केला.

चोरट्यांनी आतून लावले दरवाजे
चोरट्यांनी रवींद्र भुईभार यांच्याकडे चोरी करून दरवाजे आतून लावले होते. चोरट्यांनी दरवाजाला बाहेरूनही दुसरे कुलूप लावले होते. ते कुलूप फोडून आत आल्यावर चोरी झाल्याचे रवींद्र भुईभार यांच्या लक्षात आले.