आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरपीएफचे आठशे जवान रेल्वेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रेल्वेसुरक्षा बलामध्ये सध्या जवानांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, येत्या दाेन महिन्यांत मध्य रेल्वेला १५२८ आरपीएफ जवान मिळतील. यापैकी पाचही विभागांतून धावणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये तब्बल ८०० जवान गस्तीवर राहतील. रेल्वेत घडणार्‍या अप्रिय घटनांना यामुळे आळा घालणे शक्य होईल, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे मध्य रेल्वेचे अतिरिक्त महासंचालक प्रणगकुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकाच्या निरीक्षणासाठी प्रणगकुमार नुकतेच अकोल्यात आले हाेते. या वेळी ते म्हणाले की, मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत रेल्वे मंत्रालयाच्या आदेशावरून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत. वर्ग स्थानकांची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करायचा आहे. रेल्वे प्रवासातील सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी, प्रवासी त्यांच्या साहित्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. गत आठवड्यात मुंबई येथे महासंचालकांनी मध्य रेल्वेतील उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या बैठकीतही या मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीला मंडळ आयुक्त चंद्र माेहन मिश्र, सहायक आयुक्त पी. एल. वर्मा, ए. के. स्वामी, निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार उपस्थित होते.

अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते रडारवर : येत्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या मुंबई, साेलापूर, पुणे, भुसावळ, नागपूर या पाचही विभागांत मिळून दरराेज ८०० जवान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये गस्त घालतील. त्यामुळे निश्चितच गुन्हेगारीस आळा बसेल. धावत्या रेल्वेतील अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल.

मध्यरेल्वेत आता "आरपीएफ मित्र' संकल्पना : आरपीएफमहासंचालकांनी मुंबईतील बैठकीत भविष्यात आरपीएफ मित्र तयार करण्याच्या संकल्पनेवर भर दिला. यामुळे धावत्या रेल्वेगाड्यांमधील अप्रिय घटनांची तत्काळ माहिती मिळून कार्यवाही शक्य होईल. यानुसार भुसावळ विभागातदेखील प्रणगकुमार यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

विभागात २३० जागा रिक्त
मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागात आरपीएफ जवानांच्या २३० जागा रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा भार वाढतो. तरीही स्थानकांवर हाेणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्याबाबत आरपीएफला सूचना दिल्या आहेत. लवकरच मध्य रेल्वेच्या पाचही विभागांसाठी १५२८ जवान उपलब्ध होतील. परिणामी, प्रत्येक विभागातील रिक्त जागा भरल्या जाऊन दैनंदिन कामकाज साेयीस्कर होईल.