आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माणसाच्या छातीमंधी आग पेरणार माती..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एकापेक्षा एक सुरेख काव्यातून समाजमनाला भान देण्याचा सोहळा रविवारी मेहरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रंगला.विदर्भाच्या मातीची गाथा कवी राजेश महालेंनी मांडली. त्‍यात त्‍यांनी खालील ओळी उदृक्‍त केल्‍या.
आता माजणार माती, आता गाजणार माती,
लढाईची बोलभाषा आता बोलणार माती,
इथी नाही तिथी नाही बीज कोण पेरणार?
माणसाच्या छातीमंधी आग पेरणार माती’


मेहरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात सायंकाळच्या सत्रात काव्य मैफल रंगली. अध्यक्षस्थानी राजा धर्माधिकारी होते. काव्य मैफलीत डॉ. गिरीश खारकर, प्रा. राजेश महाले, अँड. अनंत खेळकर, प्रमोद चोबीटकर, अरविंद भोंडे, नरेंद्र इंगळे, डॉ. ममता इंगोले, भाऊ फोकमारे, विजय देशमुख, संदीप देशमुख, बोराळकर आदींचा सहभाग होता.

काव्य मैफलीचे सूत्रसंचालन कवी किशोर बळी यांनी केले. बहुतांश कवींनी सामाजिक आशयाच्या कवितांमधून उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. संदीप देशमुख यांनी ‘विदर्भाच्या सोन्याला नाही कवडीचे मोल.’ अशा शब्दांत नेत्यांना जाब विचारला, तर गिरीश खारकर यांनी

‘राब राबे वावरात माहा बाप अनवाणी
राबताना व्हटावर नामा तुक्याचीच गाणी
त्याचं फाटक धोतर, फाटलीया जिनगानी
राब राबे अनवाणी माहा बाप अनवाणी
डोया झुरूझुरूपाहे आभायाच्या आरपार
त्याची थकली नजर पावसाची नाही सर
असा निसर्ग बयाड खेळ खेळे मनमानी
राब राबे वावरात माहा बाप अनवाणी ’


अशा शब्दांत शेतकर्‍याची व्यथा मांडली, तर अरविंद भोंडे यांनी हास्यांच्या काही फवार्‍यांसह ‘कोण म्हणतो आपला भारत देश महान नाही?’ या कवितेतून देशभक्ती व्यक्त केली. अँड. अनंत खेळकरांनी जुगाड टेक्नॉलॉजीचा किस्सा रंगवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी

‘गणतंत्र दिनाला तिरंगा डौलाने फडकत होता
त्याला बघून एक बालक ढसाढसा रडत होता
तिरंग्यातील हिरवा रंग जेव्हा नजरेसमोर आला


म्हणे अशाच हिरव्या शेतासाठी आबा फाशी घेऊन मेला केशरी रंगाकडे पोरग केविलवाणं पाहत होतं , म्हणे माया शहीद बापाचं रक्त असंच तर वाहत होतं.’

अशा ओळींमधून देशातील विदारकतेचे दर्शन घडवले. यासोबतच राजा धर्माधिकारी, नरेंद्र इंगळे, प्रा. ममता इंगोले यांच्या रचनांनीही दाद मिळवली.