आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील बालकांची चित्रपटातून जागृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बालकांना योग्य दिशा अन् मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून येतो, याची प्रचिती देत ग्रामीण भागातील बालकांनी सामाजिक जनजागृती करणार्‍या चित्रपटांमधून भूमिका साकारत राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडले आहे.

प्रा. प्रदीप अवचार यांनी बालकांचा जगण्याचा अधिकार, सहभाग, विकास, शिक्षण अन् संरक्षणाच्या अधिकारावर केलेल्या चित्रपटांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, या चित्रपटांमध्ये चारचौघात बोलण्यास घाबरणार्‍या ग्रामीण बालकांनी भूमिका साकारल्या आहेत. सेव्ह द चिल्ड्रेन तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलफेअर, अकोलाच्या चमूसह बाल अधिकार प्रकल्पांतर्गत या ग्रामीण भागातील मुलांनी आधी धडे गिरवले. प्रा. अवचार व त्यांची चमू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पथनाट्याच्या माध्यमातून अभिनयाचे धडे देते तसेच त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देते. विविध बालगट प्रशिक्षणातून त्यांना जगण्याचा, सहभागीतेचा, विकासाचा, शिक्षणाचा आणि संरक्षणाचा अधिकार स्पष्ट करून दिला जातो. आज हा प्रकल्प अकोला तालुक्यातील 47, तर मूर्तिजापूर तालुक्यातील 53 गावांमध्ये असा 100 गावांत कार्यरत आहे. या गावांमधील मुले आता स्वत: तर बालकांच्या अधिकाराविषयी जागृत झाली आहेतच, ती इतरांमध्येही ही जागृती करण्यासाठी कार्य करतात. प्रकल्पांतर्गत या मुलांना शाळेत नियमित करणे, गाव बालमजुरीमुक्त करणे या विषयांवर भर दिला जातो. शिक्षकांनाही बालमनास उपयुक्त वातावरणात व पद्धतीने शिकवण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. राज्यपालांनीही या कार्याची दखल घेतली असून, पुणे येथील दौर्‍यात त्यांनी अकोल्यातील या ग्रामीण बालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी या बालकांनी ग्रामीण भागातून शेतातील बालमजुरी नष्ट करून त्यांना शाळेत दाखल करण्याची गळ घातली. बालकांच्या जगणे, सहभागीता, विकास, शिक्षण व संरक्षण या अधिकारांविषयी जाणीव व्हावी म्हणून प्रा. अवचार यांनी पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांमधून विद्यार्थ्यांनी अभिनय केला. या चित्रपटाची गुजरातमधील गीर येथील राष्ट्रीय परिषदेत सेव्ह द चिल्ड्रेनचे राष्ट्रीय समन्वयकांनी दखल घेतली. यासाठी अशोक पिंगळे, इप्सिता दास, नीलेश निखाडे, प्रा. प्रदीप अवचार, दिनेश कवडे, संदीप देऊळकर, विजय राठोड, राजू कांबळे यांचे सहकार्य होते.